Ganesh Chaturthi : बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला; ठाण्यात दीड लाख घरात होणार बाप्पा विराजमान | पुढारी

Ganesh Chaturthi : बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला; ठाण्यात दीड लाख घरात होणार बाप्पा विराजमान

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : गेली कित्येक दिवस प्रतिक्षा लागून असलेल्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस (Ganesh Chaturthi 2023) अखेर उजाडला आहे. आज ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी आदी शहरात दीड लाख घरात बाप्पा विराजमान होणार आहेत. तर याच विभागात १ हजार ५२ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तसेच १ हजार ८४५ इतक्या ठिकाणी गौरीची स्थापना करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या : 

आज लाडक्या बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे. (Ganesh Chaturthi 2023) सगळीकडे गणेशोत्सवाची मोठी धूम दिसून येत असून कोरोना काळानंतर यंदाच्या गणेशोत्सवात मोठा उत्साह सर्वत्र दिसत आहे. एकट्या ठाणे शहरात ४१ हजार ७५६ घरगुती गणेश मूर्तींची स्थापना होणार आहेत. तर शहरात ३३८ ठिकाणी सार्वजनिक मंडळ गणेश मूर्तीची स्थापना करणार आहेत. भिवंडीत १० हजार ६६२ घरगुती तर १५३ सार्वजनिक गणपती स्थापन होणार आहेत. कल्याण, डोंबिवली ४७ हजार १२९ घरगुती तर २९४ सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होणार आहे. उल्हासनगरात ४५ हजार ६५१ घरगुती तर २६७ सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान होतील. ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत एकूण १ हजार ५२ सार्वजनिक तर १ लाख ४५ हजार १९८ घरगुती गणेश मूर्तींची स्थापना होणार आहे. कुठे दीड दिवस, तर कुठे पाच दिवस, तर कुठे सात दिवस आणि दहा दिवस बाप्पाची सेवा केली जाणार आहे. पोलिस आयुक्तालय हद्दीत १४ हजार ८४५ ठिकाणी गौरीची स्थापना केली जाणार आहे.

दरम्यान, बापाच्या अगमनावेळी शांतता कायम राखण्यासाठी पोलिस दलाकडून सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. सर्व पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी यांना त्या-त्या भागात बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी रोज भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश पोलिसांना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. मंडळाकडून ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवला जात आहे का, कोणी नियमांचे उल्लंघन करीत नाही ना, याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे. रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतील स्वयंसेवक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर वाहतूक विभागाचे पोलिसांकडून देखील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची नजर गर्दीवर राहणार आहे.

असा आहे पोलिस बंदोबस्त

गणेशोत्सव काळात सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव काळात कुठेही कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी सात पोलिस उपायुक्त, १७ सहाय्यक पोलिस आयुक्तासह २६३ पोलिस अधिकारी व सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा आणि पाच राज्य राखीव दलाच्या तुकड्या संपूर्ण परिस्तिथीवर नजर ठेवणार आहेत. सण उत्सव काळात शांतता भंग होईल असे कृत्य करणाऱ्या दोनशेहून अधिक उपद्रवी व्यक्तींना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. तर सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अफवा फसरवणारे आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे मॅसेज टाकल्यास संबंधित व्यक्ती व ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उत्सव आनंद व्यक्त करण्यासाठीच असतात म्हणून आनंद साजरा करा, पण शांतता राखणे हे देखील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कुठलेही कृत्य करू नका, असे आवाहन ठाणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळ व नागरिकांना केले आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयात स्थापन होणाऱ्या मूर्ती

परिमंडळ एक (ठाणे)
सार्वजनिक मंडळ – १३३, खासगी – १४ हजार ९०७

परिमंडळ दोन (भिवंडी)
सार्वजनिक मंडळ – १५३, खासगी – १० हजार ६६२,

परिमंडळ तीन (कल्याण, डोंबिवली)
सार्वजनिक मंडळ – २९४, खासगी – ४७ हजार १२९

परिमंडळ चार (उल्हासनगर)
सार्वजनिक मंडळ – २६७, खासगी – ४५ हजार ६५१

परिमंडळ पाच (वागळे स्टेट, ठाणे)
सार्वजनिक मंडळ – २०५, खासगी – २६ हजार ८४९
एकूण – सार्वजनिक मंडळ – १ हजार ५२, खासगी – १ लाख ४५ हजार १९८

ठाणे पोलीस आयुक्तालयात स्थापन होणाऱ्या गौरी

  • परिमंडळ १ (ठाणे) – १ हजार ७२६
  • मंडळ दोन – (भिवंडी) – ५७३
  • परिमंडळ तीन (कल्याण डोंबिवली) – ६ हजार १०७
  • परिमंडळ ४ (उल्हासनगर) – ४ हजार ४४६
  • मंडळ पाच (वागळे राज्य, ठाणे) – १ हजार ९९३
  • एकूण – १४ हजार ८४५

Back to top button