सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेताळ बांबर्डेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण | पुढारी

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेताळ बांबर्डेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मागील आठ दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील सकल मराठा समाजाने एकजुट दाखवत गुरूवारी सकाळ पासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

सकाळी १० च्या सुमारास वेताळ बांबर्डे हायवे तेलीवाडी बस स्टॉप नजीक मराठा समाजातील महिला, पुरुष व शालेय विद्यार्थ्यांनी सनदशीर मार्गाने उपोषण सुरू केले आहे. गावातील देवळी, तेली व मुस्लिम समाजाने मराठा आंदोलकांची आंदोलन स्थळी भेट घेत आरक्षणास जाहीर पाठिंबा दर्शविला. दरम्यान, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. सरकारने मराठा समाजाचा अधिक अंत न पाहता आरक्षणावर तात्काळ तोडगा काढावा, आमच्या भावना शासन स्तरावर पोहचवाव्यात अशी विनंती प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. शांततेत आंदोलन करणारा मराठा समाज कसा पेटून उठतो याची वेळ राज्य सरकारने आणू नये, असा इशाराही प्रसाद गावडे यांनी आंदोलनकर्त्यांच्या वतीने दिला.

यावेळी आनंद भोगले, शैलेश घाटकर, प्रदीप गावडे, आपा गावडे, सुशांत सावंत, देवळी समाजाचे साजुराम नाईक, तेली समाजाचे दिलीप तिवरेकर व दिनेश शिरवलकर, मुस्लिम समाजाचे बाबा मुजावर व सलीम शेख, चंद्रकांत गावडे, नारायण गावडे, दिलीप सावंत, स्नेहा दळवी, वेदिका दळवी, रमण गावडे, संदीप सावंत, आबा घाडी, बाळा भोसले, प्रदिप गावडे, शैलेश घाटकर उपोषणास बसले आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button