रत्‍नागिरी जिल्हा बँक निवडणूक : सहकार पॅनलला १९ जागा, विद्यमान तीन संचालकांना पराभवाचा धक्का

रत्‍नागिरी जिल्हा बँक निवडणूक : सहकार पॅनलला १९ जागा, विद्यमान तीन संचालकांना पराभवाचा धक्का
Published on
Updated on

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे 21 पैकी 14 उमेदवार बिनविरोध झाले होते. तर सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकारच्या पाच उमेदवारांनी बाजी मारली. तर दोघांना पराभव पत्करावा लागला. विरोधी दोन उमेदवार या रत्‍नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाले आहेत. विद्यमान तीन संचालकांना पराभवाचा धक्का बसला आहे. विरोधी पक्षाचे अजित यशवंतराव, लांजा तालुका भाजपा अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले आहेत.

जिल्हास्तरीय विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारूती कांबळे यांना 692 मते, सचिन चंद्रकांत बाईत यांना 164 मते मिळाली. कांबळे 528 मतांनी निवडून आले. जिल्हास्तरीय मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते यांना 48 मते, राकेश श्रीपत जाधव यांना 45 मते मिळाली. विद्यमान संचालक मोहिते केवळ तीन मतांनी निवडून आले आहेत.
जिल्हास्तरीय नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज यांना 66 मते, ॲड. सुजित भागोजी झिमण यांना 56 मते मिळाली. विद्यमान संचालक रेडिज 10 मतांनी निवडून आले आहेत.

जिल्हास्तरीय दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण यांना 10 मते, अजित रमेश यशवंतराव यांना 25 मते मिळाली. यशवंतराव 15 मतांनी निवडून आले आहेत. रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील यांना 33 मते, प्रल्हाद महादेव शेट्ये यांना 8 मते मिळाली.

पाटील 25 मतांनी निवडून आले आहेत. लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना 16 मते, महेश रवींद्र खामकर यांना 18 मते मिळाली. भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर केवळ दोन मतांनी निवडून आले आहेत. माजी संचालक सुरेश विष्णू उर्फ भाई साळुंखे यांच्या अथक प्रयत्नातून आपला विजय साकार झाल्याची प्रतिक्रिया खामकर यांनी व्यक्त केली.

गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी यांना 13 मते, चंद्रकांत धोंडू बाईत यांना 8 मते मिळाली आहेत. जोशी 5 मतांनी निवडून आले आहेत. विद्यमान संचालक चंद्रकांत बाईत, गणेश लाखण, आदेश आंबोळकर यांना पराभव पत्कारावा लागला आहे.

सहकारचे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सोपान शिंदे, निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 9 वाजता जिल्हा नगर वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मतमोजणीला प्रारंभ झाला. दोन तासात सात मतदारसंघातील मतमोजणी संपुष्टात आली.

जिल्हा बँक अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, सुधीर कालेकर, जयवंत जालगांवकर, रमेश दळवी, ॲड.दीपक पटवर्धन, महादेव सप्रे, मधुकर टिळेकर, अमजद बोरकर, राजेंद्र सुर्वे, रामचंद्र गराटे, सौ.नेहा माने, सौ.दिशा दाभोळकर हे 14 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. संचालक मधुकर टिळेकर, महादेव सप्रे, अमजद बोरकर, राजेंद्र सुर्वे, सौ.दिशा दाभोळकर आदी मान्यवर मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते.

दुग्ध मतदारसंघातून अजित यशवंतराव, लांजा तालुका मतदारसंघातून महेश खामकर विजयी होताच समर्थकांनी फटाक्याची  आतषबाजी केली. लांजा, राजापूर तालुक्यातील समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत बाईत, त्यांचे सुपुत्र तथा शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत या दोघांना पराभव पत्करावा लागला आहे. यासह संचालक गणेश लाखण, आदेश आंबोळकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news