Devendra Fadnavis: अमरावतीतील १२ तारखेच्या मोर्चाची पहिला चौकशी करा | पुढारी

Devendra Fadnavis: अमरावतीतील १२ तारखेच्या मोर्चाची पहिला चौकशी करा

अमरावती : पुढारी ऑनलाईन

अमरावतीत १२ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेला मोर्चा हा चुकीच्या माहितीच्या आधारे आयोजित करण्यात आला. फेक न्यूजच्या माध्यमातून मोर्चाचे आयोजन कुणी केले याची चौकशी करावी, अशी मागणी विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. आज ते अमरावती दौ-यावर होते. यावेळी त्यांनी हिंसाचार झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी बोलताना महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? असा सवालही केला.

ते पुढे म्हणाले की, अमरावतीमध्ये घडलेला हिंसाचार हा दुर्दैवी आहे. त्रिपुरामध्ये न घडलेल्या घटनांची माहिती आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. त्यानंतर १२ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी कारण नसताना अनेक दुकानांची तोडफोड केली, हिंसाचार घडवला. त्यानंतर १३ तारखेला ज्या घटना घडल्या त्या १२ तारखेला घडलेल्या घटनांचे पडसाद आहेत. पोलिस १३ तारखेला घडलेल्या प्रकारावर कारवाई करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना विनाकारण पडून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. पण १२ तारखेच्या मोर्चाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्याला विरोध करू शकत नाही, तेव्हा संपूर्ण देशात लांगूलचालन करून अराजकता माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असेल हिंमत तर घाला रझा अकादमीवर बंदी असे आव्हान करत त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत, त्यावर वातावरण तापवले गेले. तेथील पोलिसांनी सर्व बाबींचा उलगडा केला. तरी सुद्धा ८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी त्यावर ट्विट केल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

त्रिपुरा येथे जी घटना घडली नाही, त्यावर १२ तारखेचा मोर्चा निघाला. हा मोर्चा मोठ्या षडयंत्राचा भाग होता. मात्र जणू १२ तारखेला काही घडलेच नाही, असे सांगण्याचा राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात काम करते आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

एका घटनेसाठी चार-चार पोलिस ठाण्यात कारवाईचा बडगा उचलला जात आहे. ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जात आहे. जर खोट्या गुन्ह्यात अडकवायचे असेल तर आमचे सारे कार्यकर्ते एकत्र जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा फडणवीसांनी दिला.

फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, आदल्या दिवशी झालेला घटनाक्रम दुर्लक्षित करायचा आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनांवर केवळ लक्ष केंद्रीत करायचे हे योग्य नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात येत आहे. टार्गेट करून, याद्या तयार करून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे, असा दावा त्यांनी केला.

 

Back to top button