

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याने प्रसिद्ध उद्योगपती शिवइंदर सिंग यांच्याकडून दोनशे कोटी रुपये उकळले होते. या प्रकरणाशी जॅकलिनचा संबंध असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे.
गेल्या रविवारी विदेशात जात असताना जॅकलिनला विमानतळ अधिकाऱ्यांनी काही तासांसाठी ताब्यात घेतले होते. ईडीने जॅकलिनविरोधात लूकआऊट सर्क्युलर काढले होते, त्यामुळे तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे नंतर सांगण्यात आले होते.
सुकेश चंद्रशेखर याने तुरुंगात असताना जॅकलिन फर्नांडीसवर दहा कोटी रुपये उधळले होते. त्याशिवाय जामिनावर बाहेर असताना सुकेशने जॅकलिनला मुंबईवरुन चेन्नईला जाण्यासाठी चार्टर्ड विमान उपलब्ध करुन दिले होते.