Ganeshotsav 2023 : कोकणातील गणेशभक्तांसाठी धावणार नाशिकची लालपरी | पुढारी

Ganeshotsav 2023 : कोकणातील गणेशभक्तांसाठी धावणार नाशिकची लालपरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गणेशभक्तांना बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले असताना हजारो कोकणवासीयांना गणेशोत्सवात कोकणातील मूळगावी पोहोचविण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बसगाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नाशिक विभागातील २१० बसेस ठाणे व मुंबई विभागात पाठविण्यात येणार आहेत. 

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी सर्वांत मोठा सण. मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कामधंद्यामुळे स्थायिक झालेले कोकणातील नागरिक दरवर्षी गणेशोत्सवासाठी मूळगावी परततात. विशेषत: मुंबई व उपनगरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे तसेच एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदा १४ नोव्हेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत गौरी-गणपतीसाठी जादा वाहतूक करण्यात येणार आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातून कोकणात जाण्यासाठी सुमारे चार हजार बसेसचे आरक्षण करण्यात आले आहे. गणेशोत्सवात जादा वाहतुकीसाठी १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे व पालघर या विभागासाठी एसटी महामंडळाच्या इतर विभागातून बसेसचा पुरवठा केला जाणार आहे. त्यानुसार नाशिक विभागातून २१० लालपरी पाठविण्यात येणार आहेत. कोकणातील प्रवासी वाहतूक सेवेसाठी चालक-वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे विभागाच्या आगारनिहाय नियोजनानुसार नाशिकची लालपरी गणेशभक्तांसाठी धावणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेस सप्टेंबरअखेर नाशिक विभागात पुन्हा दाखल होणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button