नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताच्या नवीन संसद भवनात 19 सप्टेंबरपासून कामकाज सुरू होणार असून, या नवीन इमारतीत संसदेच्या कर्मचार्यांचेही गणवेश बदलण्यात आले आहेत. सभागृहात काम करणार्या कर्मचार्यांसाठी गुलाबी कमळ असलेले क्रीम रंगाचे शर्ट, खाकी ट्राऊजर आणि क्रीम रंगाचे जॅकेट, असा नवा गणवेश असणार आहे. तसेच संसद भवनातील सुरक्षा यंत्रणेचा निळा सफारी सूट हा गणवेश बदलून त्यांना आता लष्कराच्या कॅमोफ्लॉज डिझाईनचा गणवेश वापरावा लागणार आहे.
येत्या 18 तारखेपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्या दिवसाचे कामकाज जुन्या संसद भवनात होईल, तर 19 तारखेला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नवीन सभागृहात कामकाजाला प्रारंभ होणार आहे.
नव्या संसदेत कर्मचारी व सुरक्षा कर्मचार्यांनाही नवीन गणवेश देण्यात येणार आहे. संसदेत एकूण 271 कर्मचारी आहेत. चेंबर अटेंडंट आणि सभागृहात कामकाज टिपून घेणारे कर्मचारी यांचा त्यात समावेश आहे. या सर्वांना 6 सप्टेंबरपर्यंत आपापले नवीन गणवेश घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या कर्मचार्यांना क्रीम शर्ट, क्रीम जॅकेट आणि खाकी पँट, असा गणवेश देण्यात आला आहे. त्यातील क्रीम शर्टवर गुलाबी रंगात कमळाची चित्रे आहेत. या कर्मचार्यांशिवाय संसदेची आपली सुरक्षा व्यवस्था आहे. त्या कर्मचार्यांना आतापर्यंत निळा सफारी सूट हा गणवेश होता. तोही आता बदलण्यात आला असून, त्यांना आता लष्कराच्या कॅमोफ्लॉज डिझाईनचा गणवेश देण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनने या नवीन गणवेशांची निर्मिती केली आहे.