प्रश्न शालेय सुट्ट्यांचा | पुढारी

प्रश्न शालेय सुट्ट्यांचा

– संगीता चौधरी, शिक्षण अभ्यासक

शालेय शिक्षणामध्ये विविध कारणांनी शाळांना दिल्या जाणार्‍या सुट्ट्या या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार्‍या असल्या आणि शिक्षकांसाठीही त्या सोयीच्या असल्या, तरी शैक्षणिकद़ृष्ट्या एका मर्यादेपलीकडील सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होत असते. कारण, शालेय सुट्ट्यांचा विचार करून अभ्यासक्रम निर्धारित केला जात नाही. तो आधीच ठरलेला असतो.

शालेय जीवनात अभ्यासक्रम शिकवण्याचे कार्य शिक्षकांना पार पाडायचे असते. त्यामुळे जितके शालेय दिवस कमी होत जातात तितका शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीचा वेग वाढवावा लागतो. अलीकडील काळात हवामान बदलांमुळे पावसाचे गणित बदलले आहे. त्यामुळे अतिवृष्टीसारख्या घटना वाढत आहेत. अशा काळात नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर केली जाते. सततच्या सुट्ट्यांमुळे शिक्षकांवरचा अध्यापनाचा ताण वाढतो. त्यातून अपेक्षित असे अध्यापनाचे काम न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर, विषयांच्या आकलनावर याचा प्रतिकूल परिणाम होतो. ही समस्या लक्षात घेऊन बिहारच्या सरकारच्या शिक्षण विभागाने अलीकडेच सरकारी शाळांना सणासुदीला दिल्या जाणार्‍या सुट्ट्यांत कपात करण्याचा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला. अर्थात, या निर्णयावर टीका करणारे कमी नाहीत. कारण, सुट्टी हा विषय साधारणपणे राजकीय आधारावर घेतलेला असतो. त्यामुळे काही सुट्ट्या कमी करण्याच्या निर्णयावर राजकारण तापणे स्वाभाविक आहे.

संबंधित बातम्या

बिहारच्या शाळेत सप्टेंबर ते डिसेंबर या काळात 23 सुट्ट्या होत्या. आता मात्र त्यापैकी 12 सुट्ट्या कमी केल्या आहेत. बदलत्या मागणीनुसार काही सुट्ट्या कायम ठेवल्या. बिहारमध्ये झालेली ही सुधारणा केवळ उपयुक्तच नाही तर अनुकरणीय देखील आहे. शाळेय शिक्षणात कमीत कमी सुट्ट्या असाव्यात, असे सध्याचे वातावरण आहे. समाजात प्रत्येक प्रकारचे लोक राहतात. कोणताच सण असा नाही की ते सर्वच साजरे करतात. एवढेच नाही, तर काही सण साजरे करणार्‍यांची संख्या कमीच असते. मात्र, सुट्टीचा आनंद किंवा तोटा सर्वांनाच होतो. सध्याच्या काळात अभ्यास महत्त्वाचा असताना आणि त्यातही स्पर्धा वाढत असताना विद्यार्थ्यांसाठी एक एक दिवस महत्त्वाचा असतो. अशा वेळी शालेय विद्यार्थ्यांना सामूहिक सुट्टी देणे महत्त्वाचे ठरते.

शाळेकडून दिल्या जाणार्‍या सुट्ट्यांना शैक्षणिक गुणवत्तेच्या द़ृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. एका वर्षात शाळा किती दिवस सुरू राहतात आणि विविध प्रकारच्या कामात व्यग्र असलेले शिक्षक मुलांना किती वेळ देतात, शिकवू शकतात हेदेखील पाहिले पाहिजे. अनेक शाळांत तर शिक्षकच नाहीत. एकुणातच अनेक शाळांत शिक्षणाचे गंभीर वातावरण दिसतच नाही. सुट्ट्यांची सवय एवढी लागते की, अभ्यासाचे गांभीर्यच संपून जाते. परिणामी, शालेय पातळीवर शिक्षणाचा दर्जा खालावलेला दिसतो. अशी अनेक सर्वेक्षणे असून तेथे पाचवीत शिकणारे अनेक विद्यार्थी दुसरीतील पाठ्यपुस्तकदेखील धड वाचू शकत नाहीत. शिक्षणाचा स्तर चांगला नसेल, बहुसंख्य विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळत नसतील, तर अशावेळी विद्यार्थ्यांना गरजेपेक्षा अधिक सणासुदीच्या सुट्ट्या देणे कितपत योग्य आहे?

अलीकडेच बिहार शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात काही तार्किक मुद्दे मांडले आहेत. त्यात म्हटले आहे की, प्राथमिक शाळा किमान 200 दिवस, तर माध्यमिक शाळा 220 दिवस भरायला हवी. दुर्दैवाने असे होत नाही. कधी निवडणुका, कधी परीक्षा, कधी नैसर्गिक संकट, तर कधी सण यामुळे अभ्यासात सतत अडथळे येतात. शाळेला वर्षातील शंभर दिवस सुट्टी पुरेशी आहेत. जेणेकरून शाळेत किमान 250 दिवस विद्यार्थी आपल्या भविष्याची पायाभरणी करतील. शालेय सुट्ट्यांचा निर्णय हा राजकीय किंवा एक दोन समाजांच्या मागणीच्या आधारावर ठरवू नये, तर शैक्षणिक उपयुक्ततेवर आधारित देणे संयुक्तिक राहील.

Back to top button