ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाला माळी महासंघाचा विरोध; १७ सप्टेंबरपासून राज्यभर ठिय्या आंदोलन | पुढारी

ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाला माळी महासंघाचा विरोध; १७ सप्टेंबरपासून राज्यभर ठिय्या आंदोलन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास माळी महासंघानेही विरोध केला असून याविरोधात १७ सप्टेंबरपासून राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली़

निजामकालीन कुणबी जातीचे दाखले देण्याचा सरकारी आदेश रद्द करावा, मराठा आंदोलनाच्या दबावात येऊन सरकारने मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले व ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसीवर अन्याय होईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. त्यांना खुल्या गटातून आरक्षण मिळत आहे. तेच वाढवून द्यावे किंवा आवश्यक वाटल्यास घटनादुरुस्ती करून त्यांना ओबीसी प्रवर्ग वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे़ शासनाने कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये आणि राज्य पातळीवर बिहार राज्याच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असेही अविनाश ठाकरे यांनी नमूद केले़ रवींद्र अंबाडकर, मुकुंद पोटदुखे यावेळी उपस्थित होते़

Back to top button