

पुढारी ऑनलाईन डेस्क : रत्नागिरी जिल्ह्यातील आसूद येथे झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या संदर्भात माहिती 'सीएमओ'ने(मुख्यमंत्री कार्यालय) ट्विट करुन दिली आहे.
'सीएमओ'ने(मुख्यमंत्री कार्यालय) केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी या अपघाताची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत."
दापोली तालुक्यातील आसूद येथे झालेल्या अपघातात मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. यामध्ये मिरा महेश बोरकर (वय २२ वर्षे) पाडले, वंदना चोगले (वय ३८ वर्षे) पाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर शरय्या शिरगावकर राहणार अडखळ यांचा डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. गंभीर असलेल्या जखमींचा तिघांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात हर्णै बाजारपेठ येथील चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातातील आणखी एक महिला अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत असून, तिला मुंबई येथे हलवण्यात आलं आहे. मृतांमधील आठ जणांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. दापोली तालुक्यात राज्यमार्गावर असलेल्या आसूद जोशी आळी येथे रविवारी दुपारी हा भीषण अपघात झाला.
हेही वाचा :