रत्नागिरी : अंमली पदार्थाचे सेवन व विक्री करणाऱ्या विरोधात लांजा पोलिसांची कारवाई | पुढारी

रत्नागिरी : अंमली पदार्थाचे सेवन व विक्री करणाऱ्या विरोधात लांजा पोलिसांची कारवाई

लांजा; पुढारी वृत्तसेवा : गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन व विक्री करणाऱ्यां विरोधात लांजा पोलिसांनी धडक कारवाई हातात घेतली असून शुक्रवारी (दि.१२) रात्री ७.५० वाजण्याचा सुमारास लांजा शहरातील चिंतामणी हॉस्पिटल परिसरात गांजा ओढणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये २६.०९ ग्रॅम वजनाचा गांजा देखील पोलीसांनी जप्त केला आहे.

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, लांजा शहरातील चिंतामणी हॉस्पिटलच्या मागील बाजूस चिरेबंदी कंम्पाउंड मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत अंमली पदार्थाचे सेवन चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी दि. १२ मे रोजी ७.५० वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर एमाननुरी महंम्मदवकील अजीजी उर्फ मौलु (वय २२, सद्धया रा.वैभव वसाहत, ता.लांजा, मुळ गाव औरंगाबाद, ता.बगवली, जि.संतकबीर नगर, उत्तरप्रदेश), प्रमोद यशवंत गुरव (वय ३९, रा.देवधे गुरववाडी, ता.लांजा), विनायक प्रकाश कुरूप (वय २८, रा.लांजा कुरूपवाडी, ता.लांजा), उमेश सुभाष गांगण (वय ४२, रा.भांबेड गांगणवाडी, ता.लांजा) हे ४ जण गांजा व चिलीम साहित्यासह आढळले असता पोलीसांनी घटनास्थळावरून चौघांना ताब्यात घेतले.

दरम्यान, कारवाईवेळी घटनास्थळावरुन १०.७४ ग्रॅम व ८.३५ ग्रॅम अशा दोन पॅक बंद पुड्या व ४.२४ ग्रॅम व २.७६ ग्रॅम अशा दोन फोडलेल्या पुड्या असा एकूण ४२० रुपये किंमतीचा २६.०९ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा, मातीची ८ सेमी लांबीची चिलीम, सिगारेटचे तोडलेले अर्धवट तुकडे, सफेद रंगाची बँडेज कपडा पट्टी, पांढरा कागद व माचीस आदी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे करीत आहेत.

हेही वाचा;

Back to top button