Karnataka Results : स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय – पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

Karnataka Results : स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय - पृथ्वीराज चव्हाण

कराड; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले बहुमत हे काँग्रेस नेत्यांनी स्थानिक मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळेच साध्य झाले असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Karnataka Results)

कर्नाटक मधील दोन विभागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या होत्या. तसेच 3 पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस पूर्ण बहुमताने कर्नाटकात सत्ता स्थापन करेल अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच हा निकाल लागला आहे, असे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जर आम्ही काटावर असतो तर भाजपचा सत्तेसाठीचा घोडाबाजार झाला असता. जो महाराष्ट्रासह अनेक राज्यात आपल्याला बघायला मिळाला आहे. ती शक्यता पूर्णपणे मावळली असून कर्नाटकच्या जनतेने भक्कम असे बहुमत काँग्रेसला दिलेले आहे. तरीसुद्धा काळजी घ्यावी लागेल आणि तशी काँग्रेसकडून तयारी सुद्धा दिसत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. (Karnataka Results)

कर्नाटकमधील भाजप सरकार पूर्ण भ्रष्टाचारी स्वरूपाचे सरकार होते आणि त्यांना उघडे करण्यात कर्नाटक काँग्रेसच्या नेत्यांना मोठे यश मिळाले आहे. भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची रेट लिस्टच काँग्रेसने प्रसिद्ध केली होती. कर्नाटकमध्ये स्थानिक मुद्द्यावर निवडणूक काँग्रेसकडून लढविली गेली. बेरोजगारी व महागाई हे सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे विषय होते. त्यासाठी काँग्रेसकडून जाहीरनाम्यातून पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या. ज्यामधून कर्नाटकमधील जनतेला दिलासा मिळेल. या पाच योजना म्हणजे 200 युनिट फ्री मध्ये वीज, महिलांना महिना दोन हजार रुपये भत्ता, बीपील कुटुंबातील प्रती व्यक्ती 10 किलो धान्य, बेरोजगार असलेल्या पदवीधर युवकांना तीन हजार रुपये भत्ता तर डिप्लोमा होल्डरना 1500 रुपये भत्ता ज्यामधून पुढील 2 वर्षात त्या युवकांला नोकरी मिळेपर्यंत ही रक्कम दिली जाईल. तसेच महिलांना राज्यात मोफत बससेवा. अशा योजना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. याला जनतेने चांगली साथ दिली, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button