

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतल्याने नागपुरात देवडिया काँग्रेस भवनापुढे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा झाला. भ्रष्ट मार्गाने सत्तेत येण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले, काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवेल असे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. उत्तर नागपुरातील आनंदोत्सव निमित्ताने ते बोलत होते. या विजयाने काँग्रेसचा, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ठिकठिकाणी झालेल्या जल्लोषावरून वाढल्याचे पहायला मिळाला.
भाजपच्या अमर्याद आणि बेफाम भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या कर्नाटकातील जनतेने भाजपच्या कुशासन आणि अलोकतांत्रीक धोरणांना नाकारुन सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला. ही निवडणूक काँग्रेस, व्देष व सूडबुद्धीच्या विरोधात नम्रता आणि प्रेमाने लढली आणि तेथील जनतेने व्देषाला व सुडबुध्दीला केराची टोपली दाखविली आणि सिध्द केले की त्यांना या देशात प्रेमाची गरज आहे. भारत जोडो यात्रा 21 दिवस कर्नाटकात होती. यावेळी राहुल गांधी लोकांना भेटले, त्यांना ऐकले, त्यांच्या भावना समजुन घेतल्या त्याचे उत्तर आज देश अनुभवत आहे. काँग्रेस पक्षाने दलित समाजाच्या एका नेत्याला देशातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले. मल्लीकार्जुन खरगे यांचे कर्नाटक हे गृह राज्य आहे यावर डॉ. राऊत यांनी भर दिला.
दरम्यान, जुनी पेन्शन योजना हा शासकीय कर्मचाऱ्यांना हक्क आहे. परंतु, कर्नाटक राज्यातील भाजप सरकारने तेथील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक अशा सर्वांमध्येच नाराजी होती. विधानसभेच्या निवडणुकीत या सर्व जनतेने मतदानाच्या रुपात आपली नाराजी व्यक्त केली आहे. जुनी पेन्शन योजना नाकारल्याने भाजपचा पराभव झाला.आगामी काळात राज्यात होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आपली नाराजी मतदानातून दर्शवित शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेतून बाहेर खेचतील, अशी प्रतिक्रिया आमदार सुधाकर अडबाले यांनी बोलून दाखविली. दक्षिण नागपुरातील राजबाक्षा हनुमान मंदिरासमोर रात्री गिरीश पांडव यांच्या पुढाकाराने हनुमान चालीसा पठण, मिठाई वाटप करण्यात आले.