

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे श्रेय संपूर्णपणे भाजपला आहे. 1995 पासून मी या विमानतळाच्या उभारणीसाठी प्रयत्न करीत आहे. शिवसेना नेत्यांनी या विमानतळाचे श्रेय घेण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सिंधुदुर्गमधील जनतेला वस्तुस्थिती ठाऊक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघू, व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाहुणे म्हणून कोकणात स्वागत करू, असे सांगतानाच पत्रिकेत आपले नाव तिसर्या क्रमांकावर बारीक अक्षरात छापल्याने आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटनाला न बोलावल्याने मुख्यमंत्र्यांवर संकुचितपणाचा आरोप नारायण राणे यांनी केला.
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. राणे यांनी यावेळी विमानतळाच्या उभारणीसाठी व एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा विस्ताराने आढावा मांडला.
त्यांनी सांगितले की, 1990 मध्ये मालवण-कणकवली मतदारसंघाचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल याचा अहवाल तयार करण्याचे काम 'टाटा ' कंपनीमार्फत केले गेले.
या कंपनीने दिलेल्या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटन क्षेत्राला चालना दिल्याखेरीज होणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा असा दर्जा मिळवून दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर विमानतळाच्या उभारणीला गती दिली.
या विमानतळाच्या उभारणीचे श्रेय घेऊ पाहणारी शिवसेनेची नेते मंडळी या हालचालीत कुठेच नव्हती. शिवसेनेची राज्यात सत्ता असताना औद्योगिक विकास महामंडळाकडून या विमानतळाला पाणीही मिळू शकले नाही.
विमानतळासाठी आवश्यक असलेला रस्त्यासाठीचा 34 कोटींचा निधीही आघाडी सरकार देऊ शकले नाही. हीच मंडळी आज विमानतळाच्या श्रेयासाठी पत्रकबाजी करीत आहेत, असे आरोप राणे यांनी केला.
विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख न करून आघाडी सरकारने आपली संकुचित वृत्तीच दाखविली आहे , असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देताना विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण दिले पाहिजे. त्यांचा मान ठेवलाच पाहिजे. पण तो नाही ठेवला गेला.
त्यावर कायदेशीर तरतूद नसली, तरी यातून त्यांची नीती दिसून आली. कुठेही असा काही कार्यक्रम असेल, प्रकल्प सुरू होत असेल तर विरोधी पक्षनेते असतातच.
मुख्यमंत्री असतील, तर विरोधी पक्षनेते असतीलच. मी याबाबत फडणवीसांशी बोललो देखील. पण ते म्हणाले हे लोकांच्या हिताचे आहे. त्यामुळे यात आपण आंदोलन वगैरे काहीही करायचं नाही, असे राणे म्हणाले.
उद्घाटन होत असताना यावेळी होणार्या जाहीर सभेमध्ये सत्ताधार्यांचा आणि सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आड येणार्यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मी जी विकासकामे सिंधुदुर्गात आणली, त्या सगळ्याला शिवसेनेनं विरोध केला, असा हल्ला राणे यांनी चढविला. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाचा पूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद पेटला असून त्याचे पडसाद कार्यक्रमात उमटण्याची शक्यता आहे.
यावेळी म्हणाले.कार्यक्रम पत्रिकेवरही राणेंचा आक्षेपचिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी छापण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर देखील नारायण राणेंनी आक्षेप घेतला.
मी राजकारणातील अनुभवी आणि प्रोटोकॉलनुसार उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य सिंदिया या दोघांपेक्षा वर आहे.
पण तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिले स्थान दिले हे मान्य आहे. पण माझेंच नाव छापताना अक्षर बारीक कसे झाले. ही अशी संकुचित वृत्ती आहे असे राणे म्हणाले.
माझे उद्धव ठाकरे यांच्याशी काही वैर नाही, असे मिश्कीलपणे सांगून राणे म्हणाले, तुम्ही या, उद्घाटन करा; पण हे आम्ही केलेय हे मान्य करा.
माझे त्यांच्याशी तसं काही वैर नाही; पण काहीही न करता मिरवतात. उद्धव ठाकरे यांनी यावे त्यांचे स्वागत आहे. वाटल्यास सिंधुदुर्गातल्या म्हावर्याचा पाहुणचार करू; पण श्रेय घेऊ नका, असा टोला राणे यांनी लगावला.