सिमेंट दरवाढीमुळे नितीन गडकरी कंपन्यांवर नाराज | पुढारी

सिमेंट दरवाढीमुळे नितीन गडकरी कंपन्यांवर नाराज

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

देशातील सिमेंट उद्योगातील 40 टक्के सिमेंटचा वापर मीच रस्ते बांधकामांसाठी करतो. मी सिमेंट खरेदी करू लागल्यावर सिमेंट कंपन्यांनी 180 रुपयांचे सिमेंटचे पोते 380 रुपयांना केले याचे वाईट वाटले, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सिमेंट कंपन्यांनी केलेल्या सिमेंट दरवाढीवर नाराजी व्यक्त केली.

शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, मी आता 100 टक्के सिमेंटचे रस्ते बनविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याला हा उद्योगच कारणीभूत आहेत. कारण, देशातील सिमेंट उद्योगाला माझ्यामुळे ‘ऑक्सिजन’ मिळाला. या उद्योगातील 40 टक्के उत्पादन मीच खरेदी करतो. आता हे लोक किमती वाढवू लागले आहेत. मला याचे वाईट वाटले. आता मी खुलेपणाने सिमेंट आणि पोलादचा वापर कमी करण्यावर जोर देत आहे. वेस्ट मटेरियलपासूनही आता खूप चांगले रस्ते बनवले जात आहेत. जिथे पावसाचे प्रमाण जास्त आहे तेथील रस्ते मात्र सिमेंटचेच बनतील.

स्पीड लिमिट वाढविण्यासाठी विधेयक

वाहनांच्या स्पीड लिमिटबाबत गडकरी म्हणाले की, भारतात वाहनांच्या गतीचे परिमाण आपल्या सर्वांसाठीच एक मोठे आव्हान आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी कारच्या स्पीडबाबत काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आहोत. देशात आज अनेक एक्स्प्रेस वे बनले आहेत आणि त्या रस्त्यांवर एखादे कुत्रेही फिरकू शकत नाही. कारण, रस्त्याला दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे आम्ही आता संसदेत विधेयक पारित करून ही स्पीड लिमिटबाबतची सर्व परिमाणे बदलणार आहोत.

नव्या स्पीड लिमिटची तयारी

गडकरी म्हणाले, वेगाने गाडी चालवली की अपघात होतो, अशी एक मानसिकता बनून गेली आहे. या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. आमच्या फाईलमध्ये एक्स्प्रेस वेपासून महामार्ग आणि शहरे, जिल्ह्यातील रस्त्यांची गती मर्यादा (स्पीड लिमिट) तयार करत आहोत. लोकशाहीत आम्हाला कायदे बनविण्याचा अधिकार आहे आणि त्यावर न्यायाधीशांना निर्णय घेण्याचाही अधिकार आहे.

Back to top button