

गोवा म्हंटल की बऱ्याचदा पोर्तुगिजांचा प्रभाव असणारे, चर्चचे राज्य अशी ओळख समोर येते. मंगेशी आणि शांतादुर्गा ही काही मंदिरे वगळता गोव्यातील इतर मंदिरांबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. तर गोव्यात असे एक गाव आहे, जिथे एकदोन नव्हे तर तब्बल 30-35 मंदिरे आहेत. फोंडा तालुक्यातील माशेल असे हे गाव आहे. पूर्वाश्रमीचे महा-शैल पोर्तुगीज आल्यानंतर अपभ्रंश होऊन माशेल असे झाले. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात बहुतांश देवतांची मंदिरे आहेत आणि त्यातही विशेष आकर्षण म्हणजे इथे इतरत्र कुठेही पाहायला न मिळणारे कृष्ण आणि देवकी यांचे मंदिर आहे.
पोर्तुगीज काळात फोंडा हा त्यामानाने सुरक्षित तालुका होता. सासष्टी आणि बार्देश या भागात चोडन (पुर्वाश्रमीचे चुडामणी) या बेटावर ही सर्व मंदिरे होती. जेव्हा बाटाबाटीचे प्रकार वाढले तेव्हा ही सर्व मंदिरे माशेल गावात स्थलांतरित करण्यात आली. आता ही मंदिरे आपल्या पूर्वीच्या ठिकाणीही ही मंदिरे नव्याने बांधण्यात आली आहेत तेव्हा इथे आणलेल्या मूर्ती इथेच स्थापित करण्यात आल्या आहेत. भूमिका ही इथली मूळची देवी होय. इतर देवतांच्या मूर्ती इथे आणल्यानंतर तिने या देवतांना मान दिला. म्हणून कृष्ण – देवकी मंदिर येथील प्रमुख मंदिर मानले जाते. जे येथील विशेष आकर्षण मानले जाते. माशेल इथे असणाऱ्या मंदिरांमध्ये 2 रवळनाथ मंदिरे, 3 शांतादुर्गा मंदिरे, मल्लिनाथ मंदिर, गणेश मंदिर, विठोबा मंदिर अशी विविध देवतांची मंदिरे आहेत.
जेव्हा कालियावहन हा राक्षस कृष्णाच्या मागे लागला तेव्हा कृष्णाने त्याला फसवत चोडन पर्यंत आणले. कालियावहन याने कृष्णाला चोरन इथे मारले, हि बातमी मिळताच देवकीने याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी मोठ्या कृष्णाला त्याला त्याच्या बालपणी न पाहिल्यामुळे पुन्हा त्याच्या बालरुपात येण्याची विनंती केली. आपल्या आईची ही विनंती ऐकून कृष्ण बालरुपात प्रकट झाले. देवकीने प्रेमाने त्याला त्याला कडेवर घेतले. म्हणून याठिकाणी देवकी- कृष्ण मंदिर स्थापित करण्यात आले. पुढे हे मंदिरे माशेल येथे स्थलांतरित करण्यात आले.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी इथे चिखलकाला उत्सव साजरा केला जातो. आषाढ महिन्यात पाऊस असतो या धर्तीवर परिसरात सर्वत्र चिखल करून येथे चिखलामध्ये विविध खेळ खेळले जातात. याला चिखलकाला उत्सव असे म्हंटले जाते. विविध ठिकाणाहून लोक हा उत्सव पाहण्यासाठी आणि याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. कोविड परिस्थितीमुळे गेल्या 2 वर्षात हा उत्सव आयोजित करण्यात आलेला नाही.
भारतातील अग्रगण्य रसायनशास्त्रज्ञामध्ये गणले जाणारे डॉ. रघुनाथ माशेलकर हे मूळचे माशेल या गावचे होय. येथील प्रसिद्ध कृष्ण-देवकी मंदिरामागे त्यांचे घर होते. मात्र घरची परिस्थिती जेमतेम असल्याकारणाने त्यांची आई त्यांना घेऊन मुंबईला गेली आणि पुढे ते तिथे वाढले.