राजापूर, पुढारी वृत्तसेवा : बिबट्याच्या कातडीची तस्करी (leopard skins) करणार्या शिरोडा (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथील तिघाजणांना वनविभागाच्या अधिकार्यांनी राजापुरातील पेट्रोल पंपावरून ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींना येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे.
याबाबत वनविभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता मुंबई-गोवा हायवेवरील एका पेट्रोल पंपावर दोन दुचाकीस्वारांची संशयास्पद हालचाल तेथे आलेल्या रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी व वनविभागाचा स्टाफ यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकार्यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून त्यांच्याकडील बॅगांची तपासणी केली असता एका बॅगेमध्ये बिबट्याची कातडी (leopard skins) आढळून आली.
संशयित आरोपी जयेश बाबी परब (वय 23, रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग), दर्शन दयानंद गडेकर (वय 20, रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग), दत्तप्रसाद राजेंद्र नाईक (वय – 22, रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) यांना ताब्यात घेतले. संशयित आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली.
आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एम. एच. 07, ए.एम.3294 आणि एम.एच.07, वाय. 1349 या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच ओप्पो, रेडमी, व्हिवो या कंपन्यांचे मोबाईल आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. संशयित आरोपींनी वनविभागाच्या अधिकार्यांकडे गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, रत्नागिरीचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड, घाटगे, वनपाल आरेकर, वनपाल मुल्ला, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक सागर पताडे, गावडे, संजय रणधीर, राहुल गुंठे यांनी केली.