अमेरिकेत चक्क हरणालाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले | पुढारी

अमेरिकेत चक्क हरणालाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले

वॉशिंग्टन : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सुरुवातीच्या काळात मिंक नावाचे प्राणी, वाघ, सिंह आणि कुत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त परदेशातून आले होते. आता अमेरिकेत चक्क हरणालाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. हरणाला कोरोना संक्रमण झाल्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण आहे.

कोरोना काळात अगदी मांजरापासून गोरिल्लापर्यंत अनेक प्राण्यांना हे संक्रमण झाले. मात्र, हरणालाही संसर्ग झाल्याचे आजपर्यंत ऐकिवात नव्हते. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पांढरी शेपूट असलेल्या वन्य हरणामध्ये ‘सार्स-कोव्ह-2’ हा ‘कोव्हिड 19’ ला कारणीभूत ठरणारा कोरोना विषाणू आढळला आहे. अमेरिकेत ओहियो राज्यात असे हरिण आढळून आले.

या हरणामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचेही तेथील अधिकार्‍यांनी सांगितले आहे. या हरणाला कोरोनाचा संसर्ग कसा झाला हे समजू शकलेले नाही. त्याला मानवाकडून किंवा हवेतून, अन्य प्राण्यांमधून संसर्ग झालेला असावा असा कयास आहे. माणसांच्या संपर्कात येणार्‍या प्राण्यांना कोरोनाची लागण होते हे यापूर्वीच देश-विदेशात दिसून आले आहे.

ओहियोतील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ व्हेटनरी मेडिसिनने जानेवारी ते मार्चदरम्यान हरणांमधील सॅम्पल्स एकत्र केले होते. त्यानंतर नॅशनल व्हेटनरी सर्व्हिसच्या प्रयोगशाळेत यापैकी एका हरणाला कोरोना संक्रमण झाल्याचे आढळले.

 

Back to top button