कणकवली उड्डाणपुलाच्या खचलेल्या जोडरस्त्याला केवळ मलमपट्टीच! | पुढारी

कणकवली उड्डाणपुलाच्या खचलेल्या जोडरस्त्याला केवळ मलमपट्टीच!

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : पंधरा दिवसापूर्वी कणकवली मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचा जोडरस्ता गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर सुमारे 50 मीटर लांबीने खचला होता.

त्यानंतर याबाबत कणकवलीकरांनी आवाज उठवल्यानंतर ठेकेदार कंपनीने ती लेन बंद करत पाऊस कमी झाल्यानंतर खचलेल्या भागावरील काँक्रीट काढून पिचिंग व रोलिंग करत रस्ता मजबूत करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती,मात्र तसे काहीच न करता केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीत 1800 मीटर लंबीचा उड्डाणपूल आहे. जोडरस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने गतवर्षी 13 जुलैला एसएम हायस्कुलनजीक भराव कोसळला होता. त्यांनतर कणकवलीकरांनी आवाज उठवत बोक्सेल भराव काढून शेवटपर्यंत वाय बीम पिलरवर पूल उभारण्याची मागणी केली.

मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत जोडरस्त्याचे काम रेटून नेण्यात आले. शेवटी व्हायचे ते झाले. यावर्षी पहिल्याच पावसात जोडरस्ता खचला आणि पुन्हा एकदा निकृष्ट कामाचा पोलखोल झाला.

गेल्या पंधरा दिवसापासून एका लेनवरील वाहतूक बंद आहे, केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आली आहे, त्यामुळे जोडरस्ता धोकादायकच आहे, ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण पूर्णपणे सुशेगाद आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button