historical konkan : कोकणातील टाळसुरेत ऐतिहासिक पाऊलखुणा | पुढारी

historical konkan : कोकणातील टाळसुरेत ऐतिहासिक पाऊलखुणा

दापोली; प्रवीण शिंदे : कोकण (historical konkan) हा अनेक गोष्टींनी समृद्ध असलेला प्रांत आहे. याच कोकणात भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची अनेक पाऊलखुणा दडलेली आहेत. याच कोकणात दापोली तालुक्यात प्राचीन संस्कृतीचा अनमोल ठेवा दडलेला आहे. येथील प्रत्येक गावात असे काही प्राचीन संदर्भ आहेत, जे सामाजिक किंवा सांस्कृतिक अनास्थेमुळे अजुनही सर्वांसमोर आलेले नाहीत.

दापोली तालुक्यातील टाळसुरे (historical konkan) नावाचे असेच एक गाव आहे. या गावात देखील इतिहासाच्या पाऊल खुणा आहेत. श्रीमंत बाजीराव पेशवे यांची पत्नी काशिबाई यांचे हे टाळसुरे माहेर आहे. मात्र हा इतिहास दापोली तालुक्यातील अनेकांना माहीत नसावा. दापोली शहरापासून अगदी जवळच, दापोली खेड या मुख्य मार्गावर हे गाव आहे. या गावात इतिहासाच्या पाऊल खुणा असूनही हे गाव पर्यटनाच्या पटलावर आले नाही. या गावात व आजुबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी काही ऐतिहासिक खुणा दडलेल्या आहेत. या बाबत गावातील वयोवृद्ध नागरिक या ऐतिहासिक ठेव्याची माहिती देतात. हा पुरातन ठेवा अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याने त्याचे म्हणावे तसे जतन झाले नाही. यासाठी टाळसुरे गावचे सरपंच प्रभाकर लाले आणि ग्रामस्थ यांनी मिळून या पुरातन ठेव्याचे जतन व्हावे म्हणून पुढाकार घेतला आहे. यासाठी टाळसुरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत व त्यांचे काही विद्यार्थी याचे या कामी सहकार्य करत आहेत.

historical konkan

स्थानिक इतिहासप्रेमी (historical konkan) ग्रामस्थ यांच्या एकत्रित श्रमदानातून व सरपंच श्री प्रभाकर लाले आणि यांच्या सहकार्यातून हे पुरातन भग्नावशेष अगदी बऱ्यापैकी दिसू लागले आहेत. खेर्डी जवळील जोगटेंबा येथे एक विशाल गुहासदृश लेणी येथे सापडली आहेत. या गुहेच्या वरील बाजूस कातळावर छत्तीस कोरीव खड्डे (मंडप घालण्यासाठी लागतात तशी नेमं) आहेत. या गुहेत आता वीस फुटांपर्यंत आत सहज जाता येते. ही गुहा खूप पुढेपर्यंत गेली असावी. मात्र कालौघात ही गुहा माती, दगडधोंडे व गाळाने पूर्णपणे भरून गेली आहे. पुरातत्त्व खात्याकडून अशा ऐतिहासिक व पुरातन अवशेषांची योग्य दखल घेतली गेली आणि या ठिकाणी आवश्यक खोदकाम व साफसफाई झाली तर या गुहेमध्ये गडप झालेल्या अनेक पुरातन संदर्भांचा अभ्यास व संशोधन करणे शक्य होणार आहे.

टाळसुरे या गावातून इतिहासप्रसिद्ध (historical konkan) कोडजाई नदी आजही वाहते. ही नदी अतिप्राचीन व पुरातन आहे. आजही दापोली शहरास याच नदीच्या पाण्याचा मुख्य आधार आहे. याच कोडजाई नदीच्या प्रदेशात पुरातन नागरी संस्कृती अतिशय समृद्ध स्वरुपात अस्तित्वात होती असा अंदाज आहे. या कोडजाई नदीच्या प्रदेशात सापडलेली लेणी, गुहा, पाण्याचे दगडी पाट, वाघबीळे पाहिली की या अंदाजास वास्तविक पुष्टी मिळते.

पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात याच कोडजाई नदीच्या प्रदेशात सर्वाधिक काळपर्यंत वस्ती करून होते असे उल्लेख सापडले आहेत. याच उल्लेखांवरुन असे दिसते की, त्याच काळात या प्रदेशात अशी नागरी संस्कृती विकसित झाली असावी. येथील बोरघर परिसरात अशाच प्रकारचे छोटे पांडव मंदिर आढळून येतात तर वयस्कर ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार येथे पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कातळ शिल्पा बद्दल अधिक अभ्यास व संशोधन करणे शक्य होईल.

टाळसुरे येथील कातळात अशी अर्धवट खोदकाम केलेली अपूर्ण अवस्थेत दिसणारी लेणी सापडली आहेत. यांपैकी अनेक लेणी मातीने भरून गेल्याने लेण्यांपर्यंत पोचता येत नाही. येथीलच एका लेण्यामध्ये साफसफाई करताना एक किंचित भग्नावस्थेतील पण खूप रेखीव दगडी मुर्ती आढळून येते. चार भूजा असलेल्या या मूर्तीच्या भुजांमध्ये तलवार व ढाल यांसारखी शस्त्रे आहेत. येथून काही अंतरावर अशाच प्रकारची भग्नावस्थेतील लेणी आढळली आहेत. या लेण्यांपर्यंत पोहचता यावे यासाठी अधिक व आवश्यक खोदकामाची गरज आहे.

historical konkan

या लेण्यांचा आतील भाग मोकळा झाल्यास या लेण्यांध्ये तत्कालीन नागरी संस्कृती अधोरेखित करणारे अनेक संदर्भ आढळतील. आपटी परिसरातील वाघबीळ परिसरात अशीच लेणी आढळली आहेत. येथे वाघबीळ या नावाने परिचित असलेली एक लांबलचक गुहा आहे. पुर्वीच्या काळात वाघासारख्या हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी कातळात व जंगलात अशी वाघबीळे खोदलेली असत. संकटकाळात गुप्त व सुरक्षित मार्ग म्हणूनही अशा बाघबीळांचा वापर होत असे. आपटी येथील अशा प्रकारच्या वाघबीळवजा गुहेत साधारण १५-२० फुटापर्यंत सहज वावर करता येतो. मात्र, हे वाघबीळ मातीने भरलेले असल्याने या गुहेत जास्त दूरपर्यंत जाणे शक्य होत नाही.

येथून जवळच असलेल्या भोमेश्वर मंदिर परिसरातही अशाच प्रकारचे पुरातन संदर्भ व भग्नावशेष आढळले आहेत. या परिसरात भग्नावस्थेतील अनेक दगडी मूर्त्या, ऐतिहासिक ठेवीं बाबतच्या अनास्थेमुळे अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. या सर्व मुर्त्या आज भग्नावस्थेत असल्या तरी त्यांची घडणावळ पाहता पुरातन काळात या प्रदेशात अतिशय समृद्ध नागरी वस्ती व मंदिरे असावीत याची खात्री पटते. सिंधुसंस्कृतीसारखी नागरी संस्कृती टाळसुरे परिसरात आढळलेली ही सर्व लेणी कोडजाई नदीच्या प्रदेशात आहेत. टाळसुरे येथील लेणी व भग्नावशेष, दगडी कालवे, पुढे पन्हाळेकाझी येथील लेणी यांमध्ये खूप साधर्म्य आहे. लेण्यांची रचना, प्रवेशद्वार, प्रवेशद्वारावरील दगडी कोरीवकाम, लेण्यांमधील खोल्यांची रचना, दिवाणखाने, दगडी मूर्त्या, शयनगृहे दाभोळ येथील चंडीका मंदिरातील अंतर्गत गृहरचना, भुयारे यांमध्ये खुपच साधर्म्य आहे.

शासनाच्या पुरातत्त्व खात्याने टाळसुरे, आपटी, बोरघर परिसरात आढळलेल्या अशा ऐतिहासिक पुरातन भग्नावस्थेतील गुहा, लेणी, कालवे व वाघबीळांचे अधिक संशोधन करुन या भग्नावस्थेतील लेण्यांना पुन्हा एकदा अजेडात आणणे गरजेचे आहेत.

Back to top button