नागपूरमध्ये उष्माघाताचे तीन बळी ? पोलीसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

नागपूरमध्ये उष्माघाताचे तीन बळी ? पोलीसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरात मंगळवारी (दि २७) दिवसभरात तीन अनोळखी मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कपिल नगर, जुनी कामठी आणि देवलापार परिसरात हे मृतदेह आढळल्याची माहिती आहे. मृतकांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मंगळवारी नागपूरमध्ये ४३ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. चंद्रपूरचे तापमान देखील ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे आढळलेले तिन्ही मृतदेह हे उष्माघाताचे बळी ठरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांनी उन्हात दुपारी १२ ते ४ या वेळेत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि सावलीचा ठिकाणी आधार घ्यावा, आवश्यक असेल तरच संपूर्ण काळजी घेत घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.

नागपूर जिल्ह्याचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो असा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तवला आहे. उष्णता वाढत असल्याने नागरिक घरीच थांबण्यास प्राधान्य देत असून, काही अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडताना दिसत आहेत. पुढील पाच दिवसात विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णता राहणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाट कायम राहणार आहे. वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि नागपूर या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news