Organic farming : आधुनिक शेतकरी वळतोय सेंद्रीय शेतीकडे | पुढारी

Organic farming : आधुनिक शेतकरी वळतोय सेंद्रीय शेतीकडे

सातारा : पुढारी वृत्तसेवा : Organic farming : शेतकरी वर्गाने कसदार जमिनीचा पोत ढासळू नये यासाठी सेंद्रीय शेती पिकवण्यावर भर दिला पाहिजे. अनेक ठिकाणी सेंद्रिय शेती आता मोठ्या प्रमाणावर केली जात असून रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे.

रासायनिक खताचा अमर्याद वापर टाळून याला पर्याय म्हणून शेतीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा वापर सुरू ठेवल्याने याचे भावही गगनाला भिडले आहेत. शेतकरी वर्गाने दोन्हीही हंगामात सर्रास त्याचा वापर सुरु ठेवल्याने तेही मिळणे दुरापास्त बनले आहे.

Organic farming : शेती व्यवसायात प्रगत तंत्रज्ञान वाढले

गेल्या काही वर्षापासून शेती व्यवसायात प्रगत तंत्रज्ञान वाढले असून अधिकाधिक पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी वर्गाकडून रासायनिक खतांचा अमर्याद वापर होत आहे.

रासायनिक खताच्या अमर्याद वापरामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ न होता उलट जमिनीचा पोत खालावून शेती क्षारपड होण्याचा धोका आहे. कृषि विभागाने वेळीच लक्ष देवून शेतकर्‍यांना सावध करण्याची गरज आहे.

गेली अनेक वर्षे शेतकरी वर्गाकडून शेणखताचा सर्रास वापर होत होता. कालांतराने शेती व्यवसायात आमूलाग्र बदल झाल्याने व उत्पादित मालाला चार पैसे मिळू लागल्याने शेतकरीवर्गाने शेणखताऐवजी रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये करायला सुरूवात केली.

रब्बी व खरीप हंगामात सर्व पिकांना रासायनिक अथवा शेणखताचा डोस दिल्याशिवाय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. हे सूत्र जुळून आल्याने त्याआधारेच शेती पिकवली जात आहे.

सलग काही वर्षे उसासारखे पीक घेतल्यास जमिनीचा पोत खालावतो

एखाद्या क्षेत्रात सलग काही वर्षे उसासारखे पीक घेतल्यास जमिनीचा पोत खालावून पुढे कोणतेही पीक घेण्याला अडचण निर्माण होते. अशा जमिनीला कसदार बनवण्यासाठी शेणखताची गरज भासते. शेतामध्ये रासायनिक खतांबरोबर पाण्याचेही प्रमाण वाढल्यास भविष्यात जमिनी क्षारपड होण्याचा धोका वाढला आहे.

ज्या शेतकर्‍यांकडे जनावरे पाळली जात नाहीत, अशांनी शेतात उत्पादित होणार्‍या उसासह इतर पिकांचे अवशेष (पाला) जाळून न टाकता सरीमध्ये त्याची योग्य कुजवणूक केल्यास आपोआप सेंद्रीय खताची उपलब्धता होते, अशी माहिती कृषि अधिकार्‍यांनी दिली.

एक डंपिंग ट्रॉली जातेय 7 हजाराकडे

सध्या शेणखताचे दरही वाढले असून एक ट्रॉली शेणखताचा दर 6000 रु. आहे. अनेक वर्षापासून शेतकरी शेणखतावरच भर देत आहेत. ही डंपींग ट्रॉली भरण्यासह ती विस्कटणे आदी कामे 7 हजाराकडे जात आहेत.

 

Back to top button