जगातील सर्वात छोट्या कारमधून तब्बल ८७० किलोमीटरचा प्रवास | पुढारी

जगातील सर्वात छोट्या कारमधून तब्बल ८७० किलोमीटरचा प्रवास

लंडन : काही माणसं पायावर भिंगरी असल्यासारखे फिरत असतात. काहींना नवी ठिकाणे, नवे देश पाहण्याचे कुतुहल असते. प्रवासाची आवड असणारे असे अनेक लोक बसमध्ये किंवा कारवानमध्येच आपले चालते-फिरते घरही थाटत असतात. मात्र, अ‍ॅलेक्स ऑर्चिन नावाच्या एका माणसाने अनोख्या पद्धतीने प्रवास केला आहे. त्याने जगातील सर्वात छोट्या कारमधून तब्बल 870 किलोमीटरचा प्रवास करीत ब्रिटनमधील ही भ्रमंती केली.

या 31 वर्षांच्या माणसाचा हा रोमांचक प्रवास लोकांचे कुतुहल जागवत आहे. ब्रिटनच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जाण्यासाठी त्याने या लहान कारचा वापर केला. या संपूर्ण प्रवासात अ‍ॅलेक्सच्या कारचा वेग ताशी 23 किलोमीटर होता. खरे तर जॉन ओग्रोटस् ते लँडस् एंडपर्यंत जाण्यासाठी जास्तीत जास्त चौदा तास लागतात. मात्र, हा प्रवास करण्यासाठी अ‍ॅलेक्सला तीन आठवड्यांचा कालावधी लागला.

याचे कारण म्हणजे एखाद्या टॉय कारसारखी असणारी त्याची गाडी आणि तिचा कमालीचा कमी वेग! ज्या कारमधून अ‍ॅलेक्सने हा प्रवास केला त्या गाडीचे नाव ‘पील पी 50’ असे आहे. या गाडीची निर्मिती 1962 मध्ये करण्यात आली होती. 1962 ते 65 दरम्यान या गाड्यांची निर्मिती झाली व नंतर ती थांबली. या गाडीला एकच दरवाजा आहे हे विशेष!

Back to top button