Thief Arrested In Satara : रक्‍ताच्या डागावरुन अट्टल चोरटा जेरबंद | पुढारी

Thief Arrested In Satara : रक्‍ताच्या डागावरुन अट्टल चोरटा जेरबंद

भुईंज : पुढारी वृतसेवा : Thief Arrested In Satara : घरफोडी करणारा अट्टल चोरटा भुईंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीनंतर अवघ्या चार तासात जेरबंद झाला असून त्याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

रक्‍ताचे डाग व मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांना चोरट्यांचा माग काढण्यात यश आले. संशयित सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक पोलिस ठाण्यात तब्बल 34 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Thief Arrested In Satara : थेट पोलिसांना आव्हान

आकाश हेमराज परदेशी (रा. येरवडा, पुणे) या मुख्य सराईत गुन्हेगारासह त्याचे साथीदार मनोज एकनाथ मोरे (रा.भोलावडे, ता.भोर), विवेक नामदेव कानडे (रा.वडगाव, ता.भोर) यांना अटक करण्यात आली आहे.

भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली. वेळे ता.वाई येथे दि. 7 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान अभिषेक मोहन पवार यांच्या बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून चोरट्याने सोने-चांदीचे दागिन्यावर डल्ला मारला होता. भरदुपारी झालेल्या या चोरीने वेळे परिसर हादरला.

भुईंज पोलिसांच्या तपासाला आव्हान तयार झाले. सपोनि आशिष कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचे अवलोकन केले. यावेळी गोदरेजच्या कपाटाचा पत्रा चोरट्याला लागल्याने घटनास्थळी त्याच्या रक्‍ताचे डाग पोलिसांना दिसून आले. हाच धागा तपासाच्या दिशेने पोलिसांना घेवून गेला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सर्व पोलिस सहकारी यांना तपासाच्या सुचना केल्यानंतर ग्रामस्थांच्या

सहकार्याने संशयितापर्यंत

पोहचण्यात पोलिसांना यश आले. कपाटाचा पत्रा लागल्याने हाताला झालेल्या जखमेच्या ठिकाणी चोरट्याने एका ठिकाणाहून रुमाल घेवून बांधला होता. ही माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली.

त्यानुसार पोलिसांना चोरट्यापर्यंत पोहचणे शक्य झाले. चोरट्याला जेरबंद करुन पोलिसांनी चोरीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 84 हजार 651 रुपयांचा मुद्देमाल व चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली.

पोलिसांनी आकाश हेमराज परदेशी या संशयिताला पोलिस खाक्या दाखवत बोलते केले. यावेळी त्याच्यावर चोरीसह घरफोडी, जीवे मारण्याची धमकी असे वेगवेगळे 34 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे साथीदार मनोज एकनाथ मोरे, विवेक नामदेव कानडे यांनाही ताब्यात घेवून अटक केली.

भुईंज पोलिसांचे अभिनंदन

या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल़, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शीतल जाणवे-खराडे यांनी भुईंज पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

या तपासात स्वतः सपोनि आशिष कांबळे़, पीएसआय निवास मोरे़, सहा.पोलिस फौजदार विकास गंगावणे़, हवालदार शंकरराव घाडगे, आनंदराव भोसले, शिवाजी तोडरमल, दत्‍तात्रय धायगुडे, चंद्रकांत मुंगसे, रविराज वर्णेकर, अविनाश नेहरकर, सुशांत धुमाळ, धोंडीराम गायकवाड हे सहभागी झाले होते.

Back to top button