रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : नायगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीकाठी होणार्या माती उपसा कारवाईप्रकरणी दौंड महसूल अधिकार्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने पंचनामे झाले की नाहीत यावरच ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे.
नायगाव येथील भीमा नदीलगतच्या उजनी संपादित क्षेत्रातून तसेच वनविभागाच्या हद्दीतुन मोठ्या प्रमाणावर माती उपसा होत असल्याने राजेगाव परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित माती उपसा तातडीने बंद करून संबंधितावर कारवाई करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार, वन परिक्षेत्राधिकारी दौंड यांना दिल्यानंतर तातडीने रावणगाव मंडलाधिकारी मंगेश नेवसे व नायगाव येथील गावकामगार तलाठी नंदू खरात यांनी येथील या परिसराची पाहणी केली, मात्र याबाबत सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाचे पंचनामे केले की नाहीत, केले असतील तर अज्ञात म्हणून केले, की नावानिशी केले, तसेच किती ब्रासचा पंचनामा झाला याबाबत संभ्रम असून, कारवाईबाबत ग्रामस्थ शंका व्यक्त करीत आहेत.