शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तहसील कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरिकांची कार्यालयात ठेवलेल्या एजंटामार्फत मोठी आर्थिक लूट होत आहे. एजंटांना पुढे करून अव्वल कारकून नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी केला आहे.
ग्रामीण भागातून येणार्या सर्वसामान्य लोकांना त्यांची कामे तातडीने व्हावी, अशी अपेक्षा असते. परंतु, त्यांना शासकीय कार्यालयात आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शिरूर शहरातील गॅस एजन्सीमार्फत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वापरासाठी काळया बाजारात गॅस टाक्यांची विक्री केली जाते. याबाबत संबंधित गॅस एजन्सीधारकांवर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सर्व प्रकारावर पुरवठा विभागाचा अर्थपूर्ण व्यवहारामुळे अंकुश राहिलेला नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. तातडीने या लोकांची हकालपट्टी करून नागरिकांची लूट थांबवावी, अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी सेनेचे ढोमे यांनी दिला.