मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जोगवडी ते पुरंदर तालुक्याच्या सीमेपर्यंत रस्त्याची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. मार्गावरील शेतकरी, विद्यार्थी, कामगार वर्ग तसेच अन्य वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांना वारंवार सांगूनही सर्वांकडूनच दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे, अशी खंत मुर्टी येथील रामदास कुंभार व भाजप उद्योग आघाडीचे सचिव बाळासाहेब बालगुडे यांनी व्यक्त केली आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून जाणार्या या रस्त्यामुळे मूर्टी, मोराळवाडी, वाकी, चोपडज, वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव, बारामती आदी भागातील नागरिकांची चांगली सोय होते. पुणे, जेजुरीकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता पडत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा, इंधन बचत होते. मात्र प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.