हसन्नोद्दीन कटय्यारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश | पुढारी

हसन्नोद्दीन कटय्यारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पैठण, पुढारी वृत्तसेवा : राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना पैठण शहरातही काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शहरातील काँग्रेसचा मुस्लिम चेहरा म्हणून ओळख असणारे, पैठण नगर परिषदेचे गटनेते माजी शहराध्यक्ष हसन्नोद्दीन कटय्यारे यांनी मुंबई येथे बुधवारी (दि.22) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे येणार्‍या नगर परिषदेच्या निवडणुकीत जड ठरणार असून काँग्रेसची मात्र डोकेदुखी वाढणार आहे .

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कटय्यारे यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, माजी समाज कल्याण सभापती विजुभाऊ चव्हाण, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, आप्पासाहेब गायकवाड आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, पैठण नगर परिषदेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे . या परिस्थितीत कटय्यारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे येणार्‍या काळात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग पैठण शहरात असल्यामुळे या प्रवेशाचा फायदा येणार्‍या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे.

कटय्यारे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून पक्षाला मजबूत करण्यासाठी येणार्‍या काळात पैठण शहरात प्रयत्न करणार आहे. दत्ता गोर्डे म्हणाले की कटय्यारे यांच्यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीस मदत होईल .

हेही वाचलंत का? 

Back to top button