औरंगाबाद : पुंडलिकनगरात पती-पत्नीची गळा चिरून हत्या, बेपत्ता मुलाचा शाेध सुरु | पुढारी

औरंगाबाद : पुंडलिकनगरात पती-पत्नीची गळा चिरून हत्या, बेपत्ता मुलाचा शाेध सुरु

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा औरंगाबादेतील खुनाचे सत्र सुरूच असून, आज (दि.२३)  सकाळी पुंडलिकनगर जवळील गजानन नगरात पती – पत्नीची गळा चिरून हत्या करण्‍यात आल्‍याची  खळबळजनक घटना समोर आली. श्यामसुंदर हिरालाल कळंत्री (वय ६०, रा. गल्ली क्र. 4, गजानननगर) मृत किरण श्यामसुंदर कळंत्री ( ३८, रा. गल्ली क्र. 4, गजानननगर), अशी मृतांची नावे आहेत. त्‍यांचा मुलगा देवेंद्र कळंत्री बेपत्ता असून, रविवारपासून त्याचा फोन लागत नाही. ही हत्या शनिवारी घडल्याचा अंदाज आहे. आज परिसरात दुर्गंधी पसरल्यावर हा प्रकार समोर आला.

शनिवारी सकाळी देवेंद्र कळंत्री याने आपली सावत्र बहीण वैष्णवी हिला फाेन केला. आई-वडिलांसह मी धुळे येथे जात असल्‍याचे त्‍याने सांगितले. तू आज मुक्‍कामाला काकांकडे जा, असेही देवेंद्रने  तिला सांगितले. हा फाेन त्‍याने वडील श्यामसुंदर यांच्‍या माेबाईलवरूनच केला होता. वैष्णवी शनिवारी काकांच्‍या घरी गेली. रविवारी सकाळी ती पुन्‍हा घरी आली. तिने देवेंद्रला फाेन  केला. त्‍याचा माेबाईल फाेन बंद हाेता. रविवारी रात्री तिने पुन्‍हा एकदा देवेंद्रला फाेन  केला असता, तो बंद असल्‍याचे निदर्शनास आले. सोमवारी सकाळी कळंत्री यांच्‍या घरातून दुर्गंधी येऊ लागली.  पुंडलिक नगर पोलिसांना याची माहिती देण्‍यात आली. त्यानंतर हे हत्याकांड समोर आले. घटनास्थळी डीसीपी दीपक गिर्हे, सहायक पोलिस आयुक्त विशाल ढूमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, दिलीप गांगुर्डे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी भेट दिली.

देवेंद्र हा किरण कळंत्री यांचा सावत्र मुलगा आहे. ताे दहावीनंतर पाच वर्षे शिक्षणानिमित्त बाहेर राहिला. तीनचार वर्षांपूर्वी तो घरी परतला होता. १९ मे रोजी त्याचा वडील श्यामसुंदर यांच्याशी वाद झाला असल्‍याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हे ही वाचलंत का? 

Back to top button