’देवा, तुझ्या लेकराला लोटू नको दूर’ अशी आळवणी कानी पडताच कर्तव्यनिष्ठ पोलिसांचेही हेलावले मन | पुढारी

’देवा, तुझ्या लेकराला लोटू नको दूर’ अशी आळवणी कानी पडताच कर्तव्यनिष्ठ पोलिसांचेही हेलावले मन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वारकरी संप्रदायातील महामंत्रापाठोपाठ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या रचनांसह ’देवा, तुझ्या लेकराला लोटू नको दूर…’ अशी आळवणी कानी पडताच कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणसांचेही मन हेलावून गेले. निमित्त होते शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित बंदिजनांच्या अभंग व भजन स्पर्धेचे!

 

प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्यातील कारागृहांत असलेल्या बंदिजनांसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी (दि. 21 मे) ही स्पर्धा झाली. येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, उपअधीक्षक पल्लवी कदम, वरिष्ठ तुरुंग अधिकारी पी. एस. भुसारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते.

 

कारागृहातील शिक्षक अंगद गव्हाणे, सुभेदार प्रकाश सातपुते यांनी स्पर्धेच्या संयोजनात सहकार्य केले. स्पर्धेतील सहभागाबद्दल कारागृहातील संघास दिना व प्रकाश धारिवाल यांच्या वतीने स्व. कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची फ—ेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणादायी 82 पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. अनेक अभंग बंदिजनांनी भक्तिभावाने सादर केले.

प्रत्येक व्यक्तीत सुप्त गुण असतात. शिक्षा भोगत असलेल्या बंदिजनांमध्येही ते दिसून आले आहेत. अशा व्यक्तींना स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल. हातून छोटी जरी चूक झाली असली, तरी अशा व्यक्तीला शिक्षा भोगावी लागते, पश्चात्तापाची वेळ येते. कारागृहाच्या चार भिंतींतधून बाहेर पडण्यासाठी व्यक्तिगत सुधारणा हाच मार्ग आहे.

– राणी भोसले, अधीक्षक, येरवडा कारागृह

 

Back to top button