पुढारी वृत्तसेवा, पैठण (औरंगाबाद) :
पाचोड (ता.पैठण) येथील एका लेबर कॉन्ट्रॅक्टरचा कर्ज परतफेड करण्यासाठी अश्लील फोटो प्रसारित करून ब्लॅकमेल करणाऱ्या दोन मोबाईलधारकांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोड येथील लेबर कॉन्ट्रॅक्टर निखिल कल्याणराव काळे यांना (दि. २०) मार्च रोजी ASAN ॲपवरून कर्ज आवश्यकता असल्याचा मेसेज प्राप्त झाला होता. कर्जाची आवश्यकता असल्यामुळे निखिल काळे यांनी ASAN. LoAN अॅप डाउनलोड केले. त्यानंतर कर्जासाठीची सर्व कागदपत्रे जमा केली. कर्ज मिळवण्यासाठीची सर्व दस्ताऐवज दिल्यानंतर ३० हजार रुपयाची कर्ज मर्यादा असून सात दिवसाच्या व्याजासह ५ हजार पाचशे रुपये परतफेड आहे. असे सांगून काळे यांच्या पाचोड येथील एस बी आय खात्यावर तीन हजार रुपये टाकण्यात आले.
त्यानंतर चार दिवसात ८ हजार रुपये भरायचे असे, सांगितले. काळे यांनी फोनवरून ५ हजार पाचशे रुपये परतफेड केले. नंतरही वारंवार फोन करून अधिक पैसे भरण्यासाठी मानसिक मानसिक त्रास देण्यात आला. त्यामुळे काळे यांनी सदरील कर्जॲपचा संपर्क ब्लॉक केला. काळे यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने सोशल मीडीयावरून त्यांचा फोटो प्राप्त केला. यावरून त्याचे अश्लील फोटो आणि संदेश तयार करून विविध माध्यमांवर प्रसारित केले.
हा प्रकार नातेवांइकाकडून समजल्यानंतर सदर लेबर कॉन्ट्रॅक्टर यांनी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुराशे यांची भेट घेत, याविरूद्ध तक्रार दिली. अश्लील फोटो आणि संदेश माध्यमांवर प्रसारित करून माझी बदनामी केली जात आहे. पैशासाठी अशी बदनामी करून ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार लेबर कॉन्ट्रॅक्टर काळे यांनी केली. उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. २९) रात्री माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ३८४, ३८५, ५००, ६६ ( C), ६६ (E), ६७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे.