अजिंठा येथे धावत्या बसने घेतला पेट, सुदैवाने २८ प्रवाशी बचावले . . ! | पुढारी

अजिंठा येथे धावत्या बसने घेतला पेट, सुदैवाने २८ प्रवाशी बचावले . . !


अजिंठा : पुढारी वृत्तसेवा

पुण्यावरून मलकापूरला जात असलेल्या एका खासगी लक्झरी बसला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. चालकांच्या प्रसंगवधानाने बसमधील २८ प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील अजिठा रोडवरील भारत दर्शन येथे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे गुरुवारी पहाटे पाच वाजता २८ प्रवाशांनी भरलेली (एमएच १२ ई. क्यू ९० ० ७) साई ट्रॅव्हल्सची लक्झरी बस पुण्यावरून मलकापूरकडे जात होती. दरम्यान औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील अजिंठा रोडवरील भारत दर्शन जवळ धावत्या बसने अचानक पेट घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला. परंतु, चालक संतीष गई याच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले. यानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही अन्यथा चित्र वेगळे झाले असते.

ही घटना घडताच काही मिनिटांत अजिंठा पोलीस ठाण्याचे हेड पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल बामणे, कोल्हे आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. बसने पेट घेण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जगात मला धर्मेंद्रशिवाय काहीच चांगलं वाटत नाही.. कोण आहे हा धर्मेंद्रचा कट्टर फॅन?

Back to top button