धुळे, पुढारी वृत्तसेवा : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना धुळे शहरातील मिल परिसरात घडली आहे. यासंदर्भात धुळे शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे शहरातील सुरतवाला बिल्डिंग परिसरात विद्युत नगरात राहणारे निखिल साहेबराव पाटील (वय बावीस ) या तरुणाचा आपल्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय मयूर मच्छिंद्र शार्दूल याला होता. या कारणावरून शार्दुल याने त्याच्या पत्नीला देखील अनेक वेळेस बेदम मारहाण केली होती. काही दिवसांपूर्वी तिला झालेल्या मारहाणीत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे.अनैतिक संबंधाच्या या कारणामुळे मयुर याचा निखिल पाटील याच्यावर राग होता.मयूर शार्दुल याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता गेल्या 27 जानेवारीपासून निखिल हा घरातून निघून गेला होता. त्या दिवसापासून मयूर शार्दूल हा निखिल पाटील याचा त्याच्या नातेवाईकांकडे शोध घेत होता.
निखिल हा शिरपूर तालुक्यात असल्याचा संशय असल्याने शार्दुल हा शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथे निखिल यांचा मावस भाऊ किरण पाटील यांच्या घरी गेला .त्या ठिकाणी त्याने निखिलची चौकशी केली .मात्र त्याला माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याने किरण पाटील याचे अपहरण करून त्याला धुळे येथे आणले. यानंतर दीपक याला देखील बेदम मारहाण करण्यात आली. या दरम्यान मयूर शार्दुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी निखिल याच्या काकाकडे जाऊन तेथे देखील निखिलची चौकशी करत असताना दीपक पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे दीपक पाटील गंभीर जखमी झाला. यानंतर मयूर शार्दुल याने निखिल पाटील यांच्या धुळे येथे राहणाऱ्या मामाच्या घरी जाऊन त्यांना देखील दमदाटी केली.
निखिल याला तातडीने धुळे येथे आणण्यासाठी धमकावले. त्यामुळे निखिल याला त्याच्या परिवारातील सदस्यांनी संपर्क करून त्यांना धुळ्यात बोलावून घेतले. निखिल पाटील हा धुळ्यात आल्याची माहिती मिळाल्याने मयूर शार्दुल यांनी धुळे शहरातील स्वराज्य जिमजवळ शार्दुल याच्या मावशीच्या घराजवळ निखिल पाटील यांना भेटण्यास घेऊन गेला. यानंतर निखिल याला मयुर शार्दुल, मनोज मच्छिंद्र शार्दुल ,मुकेश मच्छिंद्र शार्दुल यांच्यासह अन्य काही तरुणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर मयूर शार्दुल यांनी निखिलच्या मामाला फोन करून त्याला घटनास्थळी बोलवले. त्याचप्रमाणे निखिल याने घाबरून कुठल्यातरी गोळ्या खाल्ल्या असून त्याला उपचारासाठी घेऊन जाण्याचा निरोप दिला.
निखिलच्या मामा घटनास्थळी आले असता त्यांना निखिल घटनास्थळी पडलेला दिसला. त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले .मात्र निखिल पाटील मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. त्यामुळे निखिलचा भाऊ दीपक पाटील यांनी आज शहर पोलीस ठाण्यात त्याच्या भावाचा खून केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचलं का