

Bajrang Sonawane On Ajit Pawar Plane Crash: बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. “अजित दादा आमच्यासाठी परमेश्वरासारखे होते. त्यांच्या अपघाताची संपूर्ण आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
सोनवणे म्हणाले, राजकारणात माझे पालक अजित दादा होते. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी येडेश्वरी साखर कारखाना परिसरात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाचं जे स्वप्न अजित दादांनी पाहिलं होतं, ते आता सुनेत्राताई पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देण्याचं त्यांनी टाळलं. “या विषयावर बोलण्यास माझ्याकडे ठोस पुरावा नाही. एकत्रीकरणाच्या बैठकीलाही मी उपस्थित नव्हतो,” असं त्यांनी सांगितलं. अजित दादांसोबत हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासात महत्त्वाच्या चर्चा झाल्या होत्या, मात्र त्या तपशीलात आज मी जाणार नाही, असंही ते म्हणाले. “पवार कुटुंब एकच आहे. पवार साहेबच कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि योग्य निर्णय तेच घेतील,” असही त्यांनी सांगितलं.
अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करत सोनवणे म्हणाले, जमिनीला टेकण्याआधीच विमान कोसळलं आणि त्यानंतर दोन-तीन स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. बॉम्बस्फोट होता का, इंधनाचा स्फोट झाला का, विमानात तांत्रिक बिघाड होता का, हे सर्व मुद्दे तपासले गेले पाहिजेत. देवगिरी बंगाल्यापासून विमानतळापर्यंतचे संपूर्ण CCTV फुटेज तपासावे. कोणत्या गाडीने अजित दादा विमानतळावर पोहोचले, याचाही तपशील समोर यायला हवा.
“या प्रकरणाचा देशातील तपास यंत्रणांकडून सखोल तपास झाला पाहिजे. कुठलाही संशय राहू नये, इतकी पारदर्शक चौकशी गरजेची आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत कुणी चुकीचं बोललं असेल, तर ते अयोग्य असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तसेच बीडची सिस्टीम सुधारण्यासाठी दादा आणखी 2 वर्ष पालकमंत्री असायला पाहिजे होते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.