काटेवाडी/बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामतीजवळ घडलेल्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच आता अपघाताच्या काही मिनिटे आधी अजितदादांनी साधलेला शेवटचा संवाद समोर आला आहे. त्या संवादाची ऑडिओ क्लिप बाहेर आल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी (दि. 28 जानेवारी) सकाळी 8.19 वाजता काटेवाडी येथील त्यांचे चुलत पुतणे श्रीजित अरविंद पवार यांनी सहकारी संस्था पदाधिकारी निवडीबाबत अजितदादांना एक मेसेज केला होता. विमान हवेत असताना नेटवर्क मिळताच 8.37 वाजता अजितदादांनी स्वतःहून फोन केला. 32 हजार फूट उंचीवरून अवघ्या एका मिनिटाचा हा कॉल आणि फोन कट होताच काही क्षणातच विमान घिरट्या घेत कोसळल्याची माहिती पुढे आली. ही ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ऐकवण्यात आली असून, सध्या ती व्हायरल होत आहे. ‘शब्द न् शब्द’ तो शेवटचा संवाद श्रीजित पवार यांच्या माहितीनुसार, त्या एक मिनिटाच्या संभाषणात देखील अजितदादांच्या बोलण्यात समावेशक राजकारण, सामाजिक समतोल आणि न्याय, याचाच ध्यास दिसतो.
याबाबत बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्रीजित पवार यांनी सांगितले की, दादांशी माझं केवळ एक मिनिट बोलणं झालं. ते विमानात होते, तरीही मेसेजची दखल घेऊन कामासाठी फोन केला. मृत्यू समोर असतानाही अजितदादांच्या मनात राजकारण नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका ठासून भरलेली होती, हे या संवादातून स्पष्ट होतं.
हा कॉल केवळ शेवटचा संवाद नव्हता, तो अजित पवार यांच्या राजकीय जीवनाचे सार होता. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका, जाती-धर्मांच्या पलिकडे जाऊन निर्णय घेण्याची जिद्द आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद. आज हा आवाज आठवणीत राहिला आहे; पण त्या एका मिनिटाने अजितदादांची माणुसकी, नेतृत्व आणि समतोलाची भूमिका राज्याच्या स्मरणात कायमची कोरली गेली आहे.
काका-पुतण्यातील अखेरचे संभाषण
अजित पवार : “हॅलो हॅलो, अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेली अनेक वर्षं माळी समाजाचा माणूस. अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. ही बँक काय एवढीशी नाही. तुम्हाला माहीत नसतं. आम्हीपण सर्व जाती-धर्मांना घेऊन जातो बाळा.”
श्रीजित पवार : “आहे दादा, मला जे वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं.”
अजित पवार : “मान्य आहे, पण बरोबर आहे. माळी समाजाच्या उमेदवाराला मी सुप्यामध्ये जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. इथं ओबीसीचं आरक्षण होतं. बाकीच्यांनी दिलं नाही. पक्षांनी दुसरीच दिली आहे. त्या पद्धतीने आपण केलं आहे.”
श्रीजित पवार : “दादा, तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. ओके, ओके. थँक्यू.”