

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील देवस्थानांच्या विकासासाठी निधी मिळावा, यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांतून देवस्थानांना पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून 2 कोटी 50 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाची पौराणिक व ऐतिहासिक अशी वेगळी ओळख आहे. मतदारसंघामध्ये अनेक पौराणिक व जागृत देवस्थान असून ही देवस्थाने नागरिकांची श्रद्धास्थान आहेत. या देवस्थानांच्या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यकम होत असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, या देवस्थानाच्या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नव्हत्या. याची दखल घेऊन ना. काळे यांचा या देवस्थानांच्या विकासासाठी निधी मिळावा, यासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा सुरू होता.
मतदारसंघातील मंजूर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान (49.97 लाख), ब्राह्मणगाव येथील श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान (49.96 लाख), कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान (49.99 लाख), राहाता तालुक्यातील वाकडी येथील श्री खंडोबा देवस्थान (49.94 लाख) व कान्हेगाव येथील श्री नरहरी देवस्थान (49.98 लाख) या देवस्थानांचा समावेश असून या सर्व देवस्थानांना प्रत्येकी 25 लाख या प्रमाणे 1 कोटी 25 लाख रुपये निधी परिसर सुशोभीकरणासाठी ना. काळे यांनी मंजूर करून आणला आहे.
यापूर्वी देखील पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर गणपती देवस्थान (49.97 लाख), पुणतांबा येथील श्री चांगदेव महाराज समाधी मंदिर (99.99 लाख), माहेगाव देशमुख येथील श्री दत्त मंदिर देवस्थान (49.97 लाख), प्रती जेजुरी अशी ओळख असलेल्या वाकडी येथील खंडोबा मंदिर देवस्थान (19.98 लाख), कोकमठाण येथील लक्ष्मी माता मंदिर देवस्थान (49.98 लाख) व चांदेकसारे येथील श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान (49.99 लाख) या देवस्थानांसाठी एकूण 3.19 कोटी निधी ना. काळे यांनी आणला असून पुन्हा एकदा 2 कोटी 50 लाख निधी आणला आहे. देवस्थानासाठी भरीव निधी आणल्याने नागरिकांनी ना. काळे यांचे अभिनंदन केले आहे.
कोपरगाव मतदारसंघातील देवस्थानांच्या विकासासाठी ना. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळे मागील काही वर्षांपासून विकासापासून उपेक्षित असणार्या देवस्थानांचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित देवस्थान असलेल्या गावातील नागरिकांमध्ये व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.