नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं | पुढारी

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वक्‍तव्यप्रकरणी भाजपच्या प्रवक्‍तेपदावरून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे. देशात जे काही चालले आहे त्याला नुपूर शर्मा एकट्या जबाबदार असल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने ठेवला आहे. नुपूर शर्मा यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे आणि कॉमेंट्स हटवल्या आहेत.

नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अनेक राज्यांमध्ये तिच्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर तपासासाठी दिल्लीत हस्तांतरित करण्याची मागणी त्यांनी केली होती. आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण याबाबत नुपूर शर्माला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयातून आपली याचिका मागे घेतली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणावरील टीव्हीवरील डिबेटवर नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांनी काय केले? आम्हाला तोंड उघडायला लावू नका? टीव्हीवरील डिबेट कशासाठी होते? त्यांनी न्यायप्रविष्ट विषय का निवडला? असे सवाल त्यांनी केले आहेत.

FIR नंतर दिल्ली पोलिसांनी नुपूर विरोधात काय कारवाई केली?

सर्वोच्च न्यायालयाने नुपूर यांच्या वकिलाला या प्रकरणी संबंधित उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली. त्याचवेळी न्यायालयाने नुपूर शर्मा यांना त्यांच्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल फटकारले. त्या एका पक्षाच्या प्रवक्त्या असल्याने त्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना फटकारले. न्यायालयाने अशीही विचारणा केली की, नुपूर शर्मा विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काय कारवाई केली?. या संपूर्ण प्रकरणात कठोर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, त्याच्या तक्रारीवरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. पण अनेक एफआयआर असूनही दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कसलीही कारवाई केली नाही.

भाजपच्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद देश- विदेशात उमटले होते. अनेक ठिकाणी मोठी आंदोलने झाली होती. यामुळे वातावरण तंग झाले होते. या प्रकरणी अल-कायदा इन द इंडियन सब-कॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेने दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये आत्‍मघाती हल्‍ले करण्‍याची धमकी दिली होती. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेले वादग्रस्‍त विधानावर कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेनेदेखील जोरदार आक्षेप घेतला होता.

Back to top button