देवठाण /गणोरे(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संवेदनशील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे 18 जूनपर्यंत 12 कोटी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले. येत्या ऑगस्टपर्यंत 100% लोकांना पिण्याचे पाणी मिळेल. 30 वर्षानंतरही पाण्याचा तुटवडा येणार नाही. या धर्तीवर सर्व पाणी योजना जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असल्याने देवठाणकरांनासुद्धा 30 वर्षे कुणाकडे पाणी मागावे लागणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय जलजीवन राज्य मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत जलजीवन मिशन अंतर्गत देवठाण पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय जलजीवन राज्य मंत्री पटेल बोलत होते.
अकोले तालुक्यातील देवठाण, वरकडवाडी व दोडक नदी या तीन गावांना नळ पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशन अंतर्गत 25 कोटी रुपये खर्च करून जल देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्या प्रयत्नांचा एक आदर्श उपक्रम म्हणून या तीन गावांना पिण्याचे पाण्याची नळ योजना देण्यासाठी जास्तीत- जास्त प्रयत्न केले. योजना मंजूर करून घेतली. यासाठी सातत्याने प्रयत्न पाठपुरावा केला, असा खुलासा मंत्री पटेल यांनी केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी व केंद्रीय मंत्री म्हणून या भागात दौरा करताना अनेक समस्या दिसल्या. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. गावात टँकर सुरु होते. म्हणून प्राधान्याने हे काम हाती घेतले. ते पूर्णत्वास नेण्यासाठी चांदवडचे आ. डॉ. राहुल आहेर यांनी साथ दिली. त्यामुळे काम कमी दिवसात करू शकलो, असे मंत्री पटेल म्हणाले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, योगीराज परदेशी, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, हेमलताताई पिचड, नूतन पाटील, तहसीलदार सतिश शेटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे बिन्नर, सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, रावसाहेब वाकचौरे, इंजि. सुनील दातीर, जगनराव देशमुख,सरपंच निवृत्ती जोरवर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. राहुल आहेर, माजी आ. वैभव पिचड यांची भाषणे झाली. प्रास्ताविक माजी पं. स. सदस्य अरुण शेळके तर आभार उपसरपंच आनंदा गिरे यांनी मानले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते तर 370 कलम हटले नसते, राम मंदिर झाले नसते, ना येणारी पिढी समाधानाने जगली असती. म्हणूनच पुन्हा एकदा मोदी सरकारचं केंद्रात हवे असल्याचे सुतोवाच केंद्रीय जलजीवन राज्य मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले.
हेही वाचा