पुणेकरांनो सावधान ! स्वस्तातले गॅजेट्स पडतील महागात; बनावट बिल देऊन मोबाईल विक्री करणारी टोळी सक्रिय

पुणेकरांनो सावधान ! स्वस्तातले गॅजेट्स पडतील महागात; बनावट बिल देऊन मोबाईल विक्री करणारी टोळी सक्रिय

पिंपरी(पुणे) : तुम्हांला जर स्वस्तात मोबाईल किंवा पॉवर बँक मिळत असेल, तर सावध व्हा..! यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. मागील काही दिवसांत शहर परिसरात अनेकांची फसवणूक झाली आहे. मोबाईलसोबत देण्यात आलेले बिल बनावट तर, पॉवर बँकमध्ये चक्क साबणाच्या वड्या असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर मिळणारे स्वस्तातील गॅजेट्स महागात पडत असल्याचे चित्र आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात चाकरमान्यांची मोठी रेलचेल असते.

रेल्वे स्टेशन, बस थांबे, एसटी स्टॅन्ड, मोठ्या बाजारपेठा येथे कामगारवर्ग खरेदीसाठी जात असतो. पैशांची बचत करण्यासाठी सर्वसामान्य ग्राहक मोठ्या दुकानात जाण्यापेक्षा पथारीवर व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांना पसंती देतात. याचा फायदा घेत काही भामट्यांनी पैसे उकळण्यासाठी नवा उद्योग सुरू केला आहे. बनावट बिल देऊन मोबाईल गळ्यात मारले जात आहेत. तसेच, पॉवर बँकच्या नावाखाली साबण भरलेला प्लास्टिकचा डब्बा हातात टेकवल्याचे काही प्रकरणांमधून समोर आले आहे.

पॉवर बँकवर नामांकित कंपन्यांचे लोगो

रस्त्यावर विक्री केले जात असलेल्या पॉवर बँकच्या बॉक्सवर नामांकित कंपन्यांचे लोगो असतात. ज्यामुळे ग्राहकांना भुरळ पडते. किंमतही कमी असल्याने ग्राहकांना चांगला डिस्काउंट मिळाल्याचा फील येतो. यातील विशेष म्हणजे पॉवर बँक तपासून दिली जाते. यामध्ये एक छोटी बॅटरी असते. ज्यामुळे मोबाईल चार्जिंग होत असल्याचे दिसते. घरी गेल्यानंतर दोनच दिवसांत पॉवर बँक बंद पडते. दुरुस्तीसाठी पॉवर बँक दुकानात नेल्यानंतर आतमध्ये साबण असल्याचे समोर येते. त्यानंतर मात्र ग्राहकाकडे कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

'जीएसटी' असलेले मोबाईलचे बिल

पैशांची गरज असून अर्जंट गावी जायचे आहे, आई आजारी आहे, त्यामुळे मोबाईल विकायचा आहे, असे सांगून मोबाईल गळ्यात मारला जातो. वीस हजार किंमत असलेला नवा मोबाईल अवघ्या चार-पाच हजार रुपयांत दिला जातो. त्यासोबत बॉक्स, खरेदीची जीएसटी असलेले बिलही दिले जाते. त्यामुळे नागरिकांना संशय येत नाही. ज्या वेळी मोबाईलला काही प्रॉब्लेम येतो तेव्हा संबंधित दुकानाचे बिल दाखवल्यानंतर बिल बनावट असल्याचे काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे मोबाईल सोबत बिलही असले तरीही खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वारकर्‍यांना केले होते टार्गेट

पालखी सोहळ्यासाठी आळंदी परिसरात दाखल झालेल्या वारकर्‍यांनादेखील अशा प्रकारची पॉवर बँक देण्याचा प्रकार समोर आले आहेत. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने वेळीच काहींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पॉवर बँकमध्ये साबण असल्याचे पोलिस तपासणीत उघड झाले होते.

माझे पिंपरी येथे मोबाईल अ‍ॅक्सेसरीज विक्रीचे दुकान आहे. मी मोबाईल विक्री करीत नाही. मात्र, कोणीतरी दुकानाचे नाव वापरून बनावट बिल तयार केले आहे. त्या आधारे अनेकांची फसवणूक केल्याचे आता समोर येत आहे. मागील काही दिवसांत मला राज्यभरातून फोन आले आहेत. याबाबत लवकरच पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार करणार आहे.

– जिगर भाटी,
मोबाईल अ‍ॅक्सेसरीज विक्रेता, पिंपरी

रस्त्यावर महागड्या वस्तूंची खरेदी करू नये. ज्या दुकानाच्या नावाचे बिल असेल, त्या दुकानात जाऊन खातरजमा करावी. रस्त्यावर मोबाईल विक्री करणारे आढळून आल्यास नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त,
पिंपरी- चिंचवड 

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news