कर्जत : तुकाई उपसा योजनेसाठी ‘रास्ता रोको’

कर्जत : तुकाई उपसा योजनेसाठी ‘रास्ता रोको’

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तुकाई चारी योजनेचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातील चिंचोली फाट्यावर तुकाई कृती समितीच्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे, बापूसाहेब काळदाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रघुआबा काळदाते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीहर्ष शेवाळे, विनोद राऊत, रामदास पाटील, सतीश पाटील यांच्यासह सुमारे 17 गावातील शेतकरी सहभागी झाले होते.

शेवाळे म्हणाले, तुकाई चारी योजनेसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. चारी योजना रद्द करून उपसा सिंचन योजना करण्यात आली, यासाठी सन 2019 मध्ये 65 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. ही योजना 2022 मध्ये पूर्ण होण्याची आवश्यकता असताना योजनेचे काम अजून अपूर्ण आहे.

काळदाते म्हणाले, आमदार राम शिंदे यांनी योजना मंजूर केली. मात्र, यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही. आमदार रोहित पवार यांनी वन विभागासह इतर परवानग्या मिळवून दिल्या आहेत. तत्काळ काम पूर्ण करा, अन्यथा शेतकरी जेलभरो आंदोलन करतील.
किरण पाटील म्हणाले, तालुक्यासाठी दोन आमदार आहेत. ही योजना आमदार शिंदे यांनी मंजूर केली.

मात्र, त्यांनी जमीन अधिग्रहण व इतर परवानगी घेतल्या नव्हत्या, त्या आमदार पवार यांनी घेतल्या आहेत. मात्र, योजनेचे काम पूर्ण झाले नाही. आमदार शिंदे यांचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय शक्तीचा वापर करून तूकाई उपसा सिंचन योजना पूर्ण करून द्यावी.

यावेळी रघुनाथ काळदाते, बाळासाहेब सूर्यवंशी, विनोद राऊत, सतीश पाटील, श्रीहर्ष शेवाळे, रमेश वरकटे आदींची भाषणे झाली. अधिकारी शिंदे यांनी जूनपर्यंत तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. समितीच्या पदाधिकार्‍यांनी वालवड येथे जाऊन कामाच्या सद्यस्थितीची पाहणी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news