जामखेड : विखे-शिंदे वादात युवकांवर अन्याय : आ. रोहित पवार | पुढारी

जामखेड : विखे-शिंदे वादात युवकांवर अन्याय : आ. रोहित पवार

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर फेज 2 आणि शिर्डीत नव्याने एमआयडीसी उभारण्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या एमआयडीसी बरोबर कर्जत-जामखेडची एमआयडीसी मंजूर होणे गरजेचे होते. असे, असताना खासदार सुजय विखे यांनी हा प्रश्न न सोडविल्याने त्यांच्या मतदारसंघात कर्जत-जामखेड नाही का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला.
चौंडी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कर्जत- जामखेडला एमआयडीसी होण्याबाबत सातत्याने प्रयत्न करत आहेत. कर्जत-जामखेडच्या मध्यवर्ती ठिकाणी अकराशे एकर जमीन उपलब्ध असतानाही तेथे सरकार एमआयडीसीला मंजुरी देत नाही. मतदारसंघातील युवकांवर हे सरकार अन्याय करत आहे.

खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे यांच्या वादात एमआयडीसी रखडल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला. या मतदारसंघातील एमआयडीसी झाल्यास अनेक बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळणार असून, रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर राजकारण करू नका, असा सल्ला आमदार पवार यांनी दिला. प्रस्तावावर सही झालेली असताना, एमआयडीसी मंजूर झालेली असताना देखील हे सरकार त्याला मंजुरी देत नाही.

त्यामुळे खासदार म्हणून सुजय विखे यांची जबाबदारी होती. परंतु, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे येणार्‍या लोकसभेला मतदार योग्य निर्णय घेतील.  जो लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील कामाकडे दुर्लक्ष करतो, त्यांची दखल सर्वसामान्य मतदार घेत असतात. त्यामुळे येणार्‍या निवडणुकांमध्ये मतदार योग्य भूमिका घेतील, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

शेतकरी हितांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष

राज्यातील 21 जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असूनही शासन दखल घेत नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाही उपाययोजना करत नाही. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे केली आहे.

Back to top button