पुणे : पाण्याची साठवणूक न झाल्याने टंचाई | पुढारी

पुणे : पाण्याची साठवणूक न झाल्याने टंचाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यात 49 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. काही गावात पावसाचे प्रमाण चांगले असूनही पाणी साठवणूक न झाल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम 8 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात वनराई बंधारे बांधण्याबाबत आयोजित बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, रोजगार हमी योजना शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, जिल्ह्यातील उपवनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

वनराई बंधार्‍यामुळे पावसाचे पाणी अडविले जाऊन भूजल पातळीत वाढ होते आणि सक्षम जलस्रोतांची निर्मिती होते. कमी पर्जन्यमान असलेल्या भागात पावसाच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग अशा बंधार्‍यांमुळे करता येतो. गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होऊन पशुधनालाही या पाण्याचा उपयोग होतो. बंधार्‍यांची साखळी निर्माण केल्यास विहिरीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा.

साठा जास्त होणारी जागा निवडावी
बंधार्‍यासाठी जागा निवडताना कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त पाण्याचा साठा करणे शक्य होईल अशी जागा निवडावी. नाला अरुंद व खोल असावा, तसेच साठवणक्षमता पुरेशी असावी. तसेच नाल्याच्या तळाचा उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी असावा. बंधार्‍याची उंची जास्तीत जास्त 1.20 मीटर एवढी असावी. निवडलेली जागा प्रवाहाच्या वळणाजवळची असू नये, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

बंधारा बांधताना याचे पालन करा
वनराई बंधार्‍याचे बांधकाम करताना प्रवाहाचा उतार व रुंदी लक्षात घेऊन बंधार्‍याच्या पायथ्याची रुंदी 1.5 ते 2.5 मीटर असावी. हा बंधारा दोन्ही काठांपर्यंत बांधावा. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये रेती, वाळू भरून त्यांची तोंडे प्लास्टिकच्या दोर्‍यांनी शिवून बंधार्‍यासाठी वापरण्यात यावीत. प्रवाहाच्या वाहण्याच्या दिशेस आडवा अशी बंधार्‍याची रचना असावी. पहिला थर तयार झाल्यावर तसाच दुसरा थर रचण्यात यावा. विटांची भिंत बांधताना वापरण्यात येणारी सांधेजोड पद्धत यात वापरण्यात यावी. साधारणत: दोन अथवा तीन थरांनंतर मातीचा थर पसरविण्यात यावा, त्यामुळे रचलेल्या पोत्यांच्या मधील फटी बुजून बंधार्‍यांचे सांधे पक्के होतात व पाणी झिरपत नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

हे ही वाचा :

पुणे : जी 20 साठी महापालिकेचे ‘होऊ दे खर्च!’

Kerala Bypoll : चंडी घराण्याचा सलग १३वा विजय; काँग्रेसचे चंडी ओमन यांचा मोठा विजय

Back to top button