नगर: वाढत्या उन्हाने जिवाची होतीय काहिली, दुपारी रस्ते निर्मनुष्य; विजेचा लपंडाव जेरीस आणणारा

नगर: वाढत्या उन्हाने जिवाची होतीय काहिली, दुपारी रस्ते निर्मनुष्य; विजेचा लपंडाव जेरीस आणणारा

नगर, पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवली नाही. मात्र, मे महिन्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. नगरचे तापमान 38 ते 40 अंशांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यावसायिकांसह सामान्य माणूस जेरीस आला आहे.

मार्च-एप्रिलमध्ये राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची नासाडी केली. भर उन्हाळ्यातही पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे हाल झाले. उन्हाळ्यात पाऊस पडल्याने हवेत गारवा राहिला. परिणामी उन्हाळा जाणवला नाही. मे महिन्यातही राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभर चांगलाच उन्हाळा जाणवत आहे.

नगर शहरात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी नागरिक विविध साधनांचा उपयोग करीत आहेत. दुपारच्या वेळी रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे. उपनगरासह नगर शहरात दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य असतात. घरात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने एसी, फॅन एकाच वेळी सुरू असतात. त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण होताना दिसत आहेत. पाण्याचा दुष्काळ उन्हाचा तडाखा अन् त्यात विजेच्या लपंडावाला नगरकर वैतागले आहेत. विजेअभावी पाण्याचे नियोजनही कोलमडले आहे. अनेक भागात वीज नसल्याने पाण्याचा खोळंबा झाल्याचे दिसून येते. ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी असताना पुरेसे पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे.

उपनगरात दुकाने बंद

गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडत नाही. त्यामुळे सावेडी, बोल्हेगाव, केडगाव अशा उपनगरांमध्ये या वेळेमध्ये व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवत आहेत.

फॅन, कुलरला मागणी

दुपारच्या उकाड्यामुळे नगरमध्ये फॅन, कुलर, एसीला मागणी वाढली आहे. नागपुरी कुलर नागरिकांचा आधार बनत आहेत. शहरात जागोजागी नागपुरी कुलर विक्रेते बसले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे घराघरात फॅन, कुलर व एसीचा वापर वाढला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news