शिवराज्याभिषेक : सुराज्य निर्माण करणारा कल्याणकारी सोहळा | पुढारी

शिवराज्याभिषेक : सुराज्य निर्माण करणारा कल्याणकारी सोहळा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तिथीनुसार 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शुक्रवारी (2 जून) किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे दिमाखदार उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

भारताच्या इतिहासामधील 700 वर्षांचे परधर्म आणि परसंस्कृतीचे वर्चस्व झुगारून महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून त्याचे सुराज्यात रूपांतर केले. त्यांच्या राज्याभिषेकाने स्वराज्याचे सार्वभौम राज्यात रूपांतर झाले. शिवराज्याभिषेक महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या इतिहासात घडलेली महत्त्वपूर्ण घटना आहे. मध्ययुगीन इतिहासाचे समग्रपणे आकलन दख्खन आणि महाराष्ट्राच्या स्वराज्यनिर्मितीचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास केल्याशिवाय त्यास पूर्णत्व येत नाही. मराठ्यांच्या इतिहासावर महाराष्ट्रीयन, बंगाली, उत्तर भारतीय व काही परकीय इतिहासकारांनी आपल्या विविध द़ृष्टिकोनातून इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 21 व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये इतिहास लेखनाचा द़ृष्टिकोन हा व्यक्तिकेंद्रित न राहता त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने समाजाच्या समग्रलक्षी इतिहासाच्या मांडणीकडे वळला. त्यामुळे इतिहासामध्ये व्यक्तीच्या राजकीय पराक्रमापेक्षा व्यक्तीने समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या योगदानाचे मूल्यांकनाच्या द़ृष्टिकोनातून लिखाण करून इतिहासास समग्र रूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भारताच्या इतिहासामधील 700 वर्षांचे परधर्म व परसंस्कृतीचे वर्चस्व झुगारून महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून त्याचे सुराज्यात रूपांतर केले. त्यांच्या राज्याभिषेकाने स्वराज्याचे सार्वभौम राज्यात रूपांतर झाले. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या इतिहासात घडलेली महत्त्वपूर्ण घटना आहे. म्हणून कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बखरीमध्ये लिहितो की,

येणेप्रमाण राजे सिंहासनारूढ जाले.
या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा
मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला,
ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.

या युगात सर्वत्र मुसलमान राजे होते, आम्हा हिंदूंना राजे होता आले नाही किंवा होता येणारच नाही, अशा न्यूनगंडाने पछाडलेल्या हिंदू समाजात महाराजांनी स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जागवून स्वत:स 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करून मराठी जनात आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण केले. स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी इ. स. 11 व्या शतकापासून इत्देशीय हिंदू शासकांना इस्लामी शासक व राजवटीची चाकरी पत्करून वतनदारी, सरदारकी, सरंजामदारी पत्करून स्वत:स स्थानिक पातळीवर राजा ही पदवी धारण करण्यास बहुमान वाटत होता. त्यामुळे त्यांची निष्ठा जनतेपेक्षा स्वत:च्या वतनावर व बादशाह आणि सुलतानाच्या चरणी होती. शासक हा इस्लाम धर्मीय व बहुसंख्य जनता मात्र हिंदू धर्मीय असे व्यस्त प्रमाण असल्यामुळे जनतेस अनेक अन्याय व जुलमास सामोरे जावे लागत होते. एकीकडे सुलतानी आणि मोगली राजवट, तर दुसरीकडे धर्मसत्तेचे, कर्मकांडाचे वर्चस्व अशातच धर्मग्रंथातून निर्माण झालेल्या तथाकथित निःक्षत्रीय सिद्धांतास मूठमाती देण्यासाठी स्वातंत्र्य सार्वभौम राज्याची स्थापना करणे गरजेचे होते.

परकीय व विरोधकांवर वर्चस्व प्रस्थापित करणे, सामान्य रयतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये सुशासनाची छाप पाडणे, धर्म आणि राजकारण यांच्यामध्ये समन्वय घडवून आणून, राज्याचा गाडा सुरक्षितपणे मार्गस्थ करणे, हा राज्याभिषेक करून घेण्यामागचा मुख्य हेतू होता. राज्याभिषेकावेळी स्थानिक धर्मपंडितांचा विरोध दडपून न टाकता धर्म, परंपरा व संस्कृती यांचा आदर-सन्मान राखत स्वत:चे क्षत्रियत्व सिद्ध करून तत्कालीन पंडित गागाभट्ट यांना निमंत्रित करून, स्थानिक विरोधकांचा बंदोबस्त केला. बुलंद अशा रायगड किल्ल्याची राजधानी म्हणून निवड करून त्या ठिकाणी विविध इमारती उभ्या केल्या. राज्याभिषेक समारंभाप्रसंगी हिंदू धर्माच्या परंपरेप्रमाणे स्वत:स मौजी बंधन विधीपासून ते वैदिक विवाह, होमहवन, दान, ब—ाह्मण भोजने हे विधिवत करून परंपरावाद्यांच्या विरोधास प्रतिबंध केला. सामान्य रयतेस या सोहळ्यास बोलावून आपला राजा बनला, हे अलौकिक द़ृश्य पाहून त्यांच्या मनात समाधानाची भावना निर्माण केली. 32 मण वजनाचे सोन्याचे सिंहासन निर्माण करून हिंदूंचे स्वतंत्र सार्वभौम राज्य कोणत्याही बाबतीत परकीय राजवटीपेक्षा यत्किंचिंतही कमी नाही, हे दाखवून दिले.

छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकामुळे मोगल, आदिलशाही, कुतूबशाही या सत्ताधीशांबरोबरच इंग्रज, फे्रंच, डच, पोर्तुगीज या युरोपियन सत्ताधीशांना राज्याभिषेकाला निमंत्रित करून, हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण झालेले आहे आणि ते सहिष्णू वृत्तीचे असून, अशा कल्याणकारी राज्यात रयत सुरक्षित आहे व या राज्याच्या सीमा सातत्याने विस्तारित होणार्‍या असून, परकीयांनी यापुढे रयतेवर अन्याय आणि आक्रमण करताना सावधानतेची भूमिका घ्यावी; अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, हे कृतीने दर्शविले. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकामुळे राजकारण, समाजकारण, धर्मकारण व एकंदरीत सांस्कृतिक जीवनावर दूरगामी परिणाम घडून आले. ज्या म्लेंच्छ आणि फिरंगी सत्ताधीशांनी अनेक शतके सामान्य रयतेचे शोषण केले, अशा रयतेस 700 वर्षांनंतर स्वतंत्र हिंदू राजा मिळाला. हिंदू पदपादशाहीची पुनर्स्थापना होऊन पुन्हा एकदा हिंदूंचे स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण झाले. न्यूनगंडातून व अपसमजुतीतून निर्माण झालेला नि:क्षत्रीय सिद्धांतास तिलांजली मिळाली. इस्लामी एकाधिकारशाहीचे वर्चस्व झुगारून देऊन निर्जीव झालेल्या समाजात स्वातंत्र्याची अस्मिता जागे करण्याचे काम छत्रपती शिवाजीराजांनी केले.

– डॉ. प्रभाकर नागनाथ कोळेकर,
(पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर)

Back to top button