

नेवासा : पुढारी वृत्तसेवा
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वत:च्या देवगाव सोसायटीच्या निवडणुकीत उभे करण्यासाठी उमेदवार मिळाले नसल्याने, मंत्री शंकरराव गडाख यांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार आहे. देवगाव सोसायटीत सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यामुळे मुरकुटे यांना हा मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, येत्या 7 जूनला उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. देवगावच्या राजकारणाला आता कलाटणी मिळणार आहे. मुरकुटे यांचे होम पिच आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या देवगावमधील अनेक मुरकुटे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री गडाख यांचे नेतृत्व मान्य करून शिवसेनेत प्रवेश केला.
देवगाव ग्रामपंचायत मुरकुटे यांच्या ताब्यात असली, तरी त्यांचे समर्थक उपसरपंच व पंचायत समिती सदस्य असलेल्या पुतण्याने सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वारे आहे. नेवासा तालुक्यातील बहुसंख्य सोसायट्या मंत्री गडाख यांच्या ताब्यात आहेत.
देवगाव सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, या निवडणुकीत गडाख-मुरकुटे यांच्या गटांत जोरदार लढत होईल, अशी चर्चा होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुरकुटे यांना एकही उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे स्वतःच्याच गावात त्यांची मोठी राजकीय नामुष्की झाल्याचे बोलले जात आहे .
माजी आमदार मुरकुटे यांचे पुतणे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांच्यासह अनेकांनी भाजप सोडले. आता तालुक्यात भाजपमध्ये बोटावर मोजण्याइतके सदस्य शिल्लक राहिले आहेत. देवगाव सोसायटीच्या निवडणुकीसाठी माजी आमदारांनी खूप मोठी तयारी केली होती. परंतु, देवगावमधून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश झाल्याने मुरकुटे यांना उमेदवार मिळाले नाही. याउलट, गडाख गटाकडून अनेकांनी अर्ज भरले.
ग्रामीण भागातील राजकारण हे सहकारी सोसायटीवर अवलंबून असते. गाव पातळीवरील नेतेही वर्षांनुवर्षे संस्था आपल्या ताब्यात ठेवतात.परंतु, माजी आमदारांचे गाव असूनही मोठी मानहानी झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देवगाव सेवा सोसायटी ही तालुक्यातील मोठ्या विविध कार्यकारी सेवा संस्थांपैकी एक मानली जात आहे.देवगाव सोसायटीत एकूण 1110 मतदार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत काल (दि.20) होती. दि. 23 मे रोजी अर्जांची छाननी आहे.
मुरकुटे आता आगामी काळात काही खेळी करतात का? ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्ज माघारीची मुदत दि.7 जून असून दि.19 जून रोजी मतदान होणार आहे. माजी आमदार मुरकुटे यांचे पुतणे अजित मुरकुटे यांच्या हातात शिवबंधन बांधून मंत्री गडाख यांनी पहिला जोरदार राजकीय धक्का दिला. त्यानंतर देवगाव सोसायटीच्या निवडणुकीत एकही उमेदवार मिळू न देण्याची खेळी करीत मुरकुटे यांना दुसरा धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सहा अपक्ष उमेदवारांनीही भरले अर्ज
देवगाव सेवा सोसायटीच्या निवडणुकीसाठी एकूण 57 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाकडून 51 लोकांनी अर्ज भरले असून, 6 अपक्षांनीही अर्ज भरले आहेत. माजी आमदार मुरकुटे यांच्याकडून एकही अर्ज भरला गेलेला नाही, याची तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.
निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता
देवगाव सेवा सोसायटीची सभासद संख्या 1442 आहेत. मात्र, मतदानासाठी त्यापैकी 1 हजार 110 सभासद पात्र ठरले आहेत. आहेत. या संस्थेने आतापर्यंत 9:50 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा सभासद शेतकर्यांना केला आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या देवगाव सोसायटीच्या निवडणुकीबाबत तालुक्याला मोठी उत्सुकता लागली आहे.
हे ही वाचा :