शरद पवार श्रीगोंद्याचा दावा सोडतील काय?

c
c

श्रीगोंदा(अहमदनगर) : जागा वाटपात राष्ट्रवादीकडे असलेला श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर शरद पवारांचा मोठा प्रभाव आहे. माजी आ. राहुल जगताप हे तयारीला लागले असतानाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही दावेदारी करत रणशिंग फुंकले आहे. जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्याभर काँग्रेसची मोर्चेबांधणी सोडून ते श्रीगोंद्यात रमल्याने काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचे नगरमधील 'जनसंवाद' यात्रेच्या प्रारंभातून समोर आले. निवडणुकीला वर्ष असले तरी श्रोंगाद्यात मात्र उमेदवारीवरून दोन्ही काँग्रेसमध्ये ओढताण सुरू झाल्याचे चित्र आहे.

श्रीगोंद्यातील भावी आमदार काँगेसचाच अशापद्धतीने चित्र आतापासूनच रंगवले जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेल्या जागेबाबत शरद पवार तडजोड करतील काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. बबनराव पाचपुते हे अनेक वर्षे श्रीगोंद्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. राहुल जगताप, स्व. शिवाजीराव नागवडे यांनीही श्रीगोंद्याचे प्रतिनिधीत्व केले. विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी असला तरी आतापासूनच श्रीगोंद्याचा आमदार कोण?, कोणत्या पक्षाचा आमदार याची चर्चा सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 2019 च्या निवडणुकीत पवार यांच्या एका सभेने बाजी पलटण्याच्या बेतात असल्याचा इतिहास आहे. घनश्याम शेलार यांचा थोडक्यात पराभव झाला.

शरद पवार-अजित पवार यांच्यात राष्ट्रवादीची विभागणी झाल्यानंतर माजी आमदार राहुल जगताप यांनी शरद पवारांची साथ दिली. काळाची पावले ओळखून जगताप यांनी घेतलेली भूमिका तालुक्यात चर्चेचा विषय बनली होती. 2014 च्या निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्याने जगताप यांची सध्याची पावले आश्वासक दिशेने असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात.

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेनिमित्ताने श्रीगोंद्याचा आमदार काँग्रेसचा असेल असे संकेत नेत्यांकडून दिल्याने नागवडे गटात उत्साहाचे वातावरण आहे. उमेदवार कोण?, अनुराधा नागवडे की राजेंद्र नागवडे या बाबत मतमतांतरे असली तरी सौंचा भावी आमदार असा होणारा उल्लेख दिशा स्पष्ट करणारा ठरू पाहतोय.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अजूनही एकत्रित आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे असणारी जागा शरद पवार काँगेसला सोडणे तितकेसे शक्य नसल्याचा दावाही केला जातोय. जागा वाटपात फेरबदल करतेवेळी पवार स्वतःच्या गटाच्या जागांमध्ये बदल करत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पवार यांनी नगर दक्षिणची जागा काँग्रेस पक्षासाठी सोडण्यासाठी नकार दिल्याचे उदाहरण त्यासाठी पुरेसे. जिथे पक्षाची ताकद अधिक, तिथल्या जागेबाबत पवार तडजोड करत नाहीत असा त्याचा अर्थ. त्यामुळेच शरद पवार श्रीगोंद्यावरील दावा सोडणार नाहीत, त्यावेळी नागवडेंची भूमिका काय? या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

2019 च्या निवडणुकीत काँगेस-राष्ट्रवादी एकत्रित लढले त्यावेळी राजेंद्र नागवडे यांनी बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करत त्यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याअगोदर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐनवेळी उमेदवाराची शोधाशोध करावी लागली. काँग्रेसला त्या निवडणुकीत मिळालेली मते पाहता आगामी विधानसभेसाठी शरद पवार काँग्रेसला जागा सोडतील काय? हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news