राहुरी : भाजपचे हुकूमशाहीचे भूत जनताच उतरविणार : आ. प्राजक्त तनपुरे

राहुरी : भाजपचे हुकूमशाहीचे भूत जनताच उतरविणार : आ. प्राजक्त तनपुरे
Published on
Updated on

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : देशासह राज्यात ईडी व सीबीआयमार्फत विरोधकांना संपविण्याचे कारस्थान म्हणजे हुकूमशाही. भाजपची हुकूमशाही जनताचं संपविणार आहे. सत्तेवर येण्यासाठी पेट्रोल-डिझेल 30 रूपये लिटर तर गॅसचेही दर कमी करण्याचा शब्द देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. राज्यातील शिंदे-फडणवीस शासन गतिमान नसून गतिमंद आहे.

वर्ष उलटूनही शेतकर्‍यांना अतिवृष्टीसह सततच्या पावसाचा ढबू निधी दिला नाही. दुधाचे दर कोसळले, अशी नाराजी व्यक्त करत शेतकर्‍यांना त्रास देणार्‍या भाजप शासनाला जागा दाखविण्याची वेळ आल्याचे मत आ. प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे 5 कोटी 35 लाख रूपये निधीतून उभारलेल्या नवीन वीज उपकेंद्राचा लोकार्पण तर 44 कोटी रूपये निधीच्या वरवंडीसह इतर 10 गावांच्या पाणी योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खडांबेचे लोकनियुक्त सरपंच अण्णासाहेब माळी होते.

पुढे आ. तनपुरे म्हणाले, भाजपचा एकाधिकार राजवट आणण्याचा विचार आहे. विरोधक नकोसे असल्याने ईडी व सीबीआयचा वापर जोमात सुरू आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस दराचा भडका झाला. शेतीसाठी लागणारे साहित्य असो की बियाणे, खतांच्या किंमती वाढल्या. देशामध्ये हुकूमशाही राजवट आणण्याची तयारी भाजप करीत आहे. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी भाजपपासून सावध रहावे, असा सल्ला त्यांनी दिला.

खडांबे परिसराचा वीजप्रश्न मार्गी लावावा, पाणीप्रश्न सुटावा म्हणून स्व. धोंडीराम सोनवणे यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. सत्तेत सहभागी होताच पोटतिडकीने पाणी योजना व वीजप्रश्न मार्गी लावला. लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडविल्याशिवाय मी शांत बसणार नाही. राज्यात गतिमान शासन असल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे उर्जा खाते असतानाही महावितरणची वाताहात झाली. निवडणुका आल्यानंतर जनता या गतिमंद शासनाला नक्कीच जागा दाखविणार, असा ठाम विश्वास आ. तनपुरे यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी केले. माजी उपसभापती बाळासाहेब लटके, बाळासाहेब जठार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन नवनाथ खळेकर यांनी केले. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, बा. स. सदस्य मधुकर पवार, चंद्रकांत पानसंबळ, मंगेश गाडे, अ‍ॅड. ऋषिकेश मोरे, संदीप निकम, सचिन भिंगारदे, पं. स. माजी सदस्य रवींद्र आढाव, शाम खेसमाळसकर, अरूण पानसंबळ, अशोक बकरे, वेणूनाथ कोतकर, गोरक्षनाथ पवार, रामदास बाचकर, के. एम. पानसरे, उपसरपंच किशोर हरिश्चंद्रे उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस शासनाचा बुरखा फाटला

राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारल्यानंतर कोण कोणत्या खात्याचा मंत्री आहे हे सत्ताधार्‍यांनाच
समजत नव्हते. प्रश्न टाळण्यासाठी मंत्री हजर राहत नव्हते. शिंदे-फडणवीस शासनाचा गोंधळ अधिवेशनात दिसला. तोच गोंधळ आताही तसाच असून एकाही प्रश्नाची सोडवणूक न करता सत्ताधारी जनतेशी खेळत असल्याचा आरोप आ. प्राजक्त तनपुरे यांनी केला.

…तर आ. निलेश लंके खासदार होणारचं : जठार

आ. निलेश लंके यांच्या पत्नीला बाळासाहेब जठार यांनी सागितले की, कोरोना कालखंडात आ. लंके यांनी हजारो गोरगरीबांचा आशिर्वाद घेतला आहे. आ. लंके सारख्या नेत्याची जिल्ह्याला मोठी गरज आहे. नगर दक्षिणेत आमदार लंके हेच खासदार होणार असा दावा जठार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news