बारामती : तक्रार देण्यासाठी गेलेल्या विधवेला ठेवले ताटकळत

बारामती : तक्रार देण्यासाठी गेलेल्या विधवेला ठेवले ताटकळत
Published on
Updated on

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : 'एका नातेवाइकाकडून शरीरसुखाची मागणी होत आहे' या अत्यंत गंभीर तक्रारीसाठी गेलेल्या विधवा महिलेस वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात वाईट वागणूक मिळाली. 'समोरच्या पार्टीला तुमच्याविरुध्द तक्रार करायला लावतो मग तुमची तक्रार घेतो' अशी तंबीही देण्यात आली. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या स्वीय सहायकाने सांगितल्यावरच तक्रारीचे दोन तासांचे दिव्य पार पडले. विधवा महिलेच्या तक्रारीबाबत पोलिस इतके असंवेदनशील कसे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

वडगावनजीकच्या एका गावातील महिलेला हा अनुभव आला. तिने पोलिस ठाण्यातच हा प्रकार कथन केला. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजारी नातेवाईक राहतो. गेली काही वर्षे तो तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. महिलेने त्याला दाद दिली नाही. त्यामुळे त्याने तिच्या मुलांवर वेगवेगळ्या केसेस करण्याची धमकी दिली. दरम्यान, संबंधित महिलेने पडदे बांधून तयार केलेले बाथरूम व पक्के शौचालय ज्या दिशेला आहे त्याच दिशेला नातेवाइकाने जाणूनबुजून दरवाजा तयार केला.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांत तात्पुरता अर्ज दिला आणि ठाणेप्रमुखांना फोन केल्यावर दोन पोलिस तातडीने पाहणीसाठी आले. पण पोलिसांनी 'त्यांचे घर आहे, कुठेही दरवाजा पाडतील तुम्हाला काय करायचे आहे?' अशी उलट समज दिली असल्याचे या महिलेने सांगितले. या महिलेने दुपारी तीन-सव्वातीनच्या दरम्यान मुलासह वडगाव-निंबाळकर पोलिस ठाणे गाठले. गळ्यात माळ असलेल्या ठाणे अंमलदारांना अर्ज दिला. त्यांनी,'तुमची तक्रार घेतली जाईल. काही काळजी करू नका.' असा दिलासा दिला.

मात्र, त्यानंतर वस्तीवर पाहणीला गेलेले दोन पोलिस आले आणि नूर बदलला. एकजण म्हणाला, 'तो विषय संपला ना मघाशीच. कशाला आलाय परत?' त्यावर महिला व तिच्या मुलाने, 'तक्रार नोंदवून तर घ्या साहेब' अशी आर्जव केली. त्यावर पोलिसानी, 'थांबा पुढच्या पार्टीला पण बोलवतो आणि तुमच्यावर केस करायला लावतो' असे सुनावले. यावर महिला व मुलाशी पोलिसांची दहा मिनिटे हुज्जत झाली. मग मुलाने रजेवर असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांना फोन केला. त्यांनीही समाधानकारक प्रतिसाद दिला आणि लगेचच ठाण्यात फोनही फिरविला. पोलिसांनी घेतो तक्रार असे सांगितले पण घेतली नाही.

ताटकळत बसलेल्या या माय-लेकरांनी अखेर अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना फोन केला. मुसळेंनी गांभीर्य ओळखून 'पोलिसांकडे फोन द्या' असे सुचविले. पण पोलिसांनी फोन घेण्यास नकार दिला. मग मुसळे यांनीच, 'स्पीकरवर फोन टाका मी बोलतो' असे सुचविले. फोन स्पीकरवर टाकून पोलिसांपुढे टेबलावर ठेवला.

मग पोलिस मुसळे यांच्यासमोर,'साहेब, तक्रार घेतलीय. त्यांना बसा म्हणालोय.' असे सरळ झाले. यानंतरही पोलिसाने बाहेर येत 'तुम्ही कशाला वर फोन करत चाललाय' असा ढोस मुलाला दिला. मुलाने ' तुम्ही जर तक्रार घेत नसाल तर नेत्यांच्या कार्यालयाकडे मदत घेतली तर बिघडले का?' असे उत्तर दिले. दोन तासांच्या या नाट्यानंतर मुलाला बाहेर काढत महिलेला आत बसवत तिची तक्रार महिला पोलिसांच्या समक्ष घेण्यात आली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news