

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात काल (सोमवारी) चांगल्या प्रतीच्या कांद्याला 5 हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. मागच्या लिलावाच्या तुलनेत एक हजार रुपये भाववाढ झाली. नवरात्रोत्सवामुळे नेप्ती उपबाजारात सध्या कांद्याची आवक घटली आहे. कालच्या लिलावासाठी 32 हजार 527 क्विंटल म्हणजे 59 हजार 139 गोण्या कांद्याची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3800 ते 5 हजार रुपये भाव मिळाला. मध्यम कांद्याला 2700 ते 3700 रुपये, तर तीन नंबरला 1600 ते 2600 रुपये आणि लहान आकाराच्या कांद्याला 800 ते 1500 रुपये भाव मिळाला.
सणासुदीचे दिवस, नवरात्रोत्सव, शेतीची कामे व भाववाढीचे अपेक्षा, यामुळे नेप्ती उपबाजारात सध्या कांद्याची आवक चांगलीच थंडावली आहे. त्यामुळे कांदा भावाचा आलेख उंचावत चालला आहे. त्यामुळे कांदाउत्पादक सुखावले आहेत. लाल कांद्याचीची आवक सुरू झाली असून, त्यालाही चांगला भाव मिळत आहे. या वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने चाळीतला कांदा सुरक्षित राहिला आहे. भाववाढीमुळे शेतकर्यांची कांदा विक्रीसाठी लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा