सांगलीत पाचशे खाटांच्या रुग्णालयास निधी देणार : हसन मुश्रीफ | पुढारी

सांगलीत पाचशे खाटांच्या रुग्णालयास निधी देणार : हसन मुश्रीफ

सांगली, पुढारी वृत्तसेवा : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या सेवेमध्ये अनेक कमतरता आहेत. याठिकाणी उभारण्यात येणार्‍या पाचशे बेडच्या हॉस्पिटलसाठी अधिवेशनात पुरवणी मागणीमध्ये निधी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सांगलीच्या रुग्णालय इमारतीचे ऑडिट करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दैनिक पुढारीतील वृत्तमालिकेची दखल घेत मुश्रीफ यांनी सोमवारी सांगलीच्या शासकीय रुग्णालयांना भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी अधिष्ठाता यांच्या कार्यालयात अनेक संघटना व लोकप्रतिनिधी, डॉक्टरांची बैठक घेतली. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम उपस्थित होते.

रुग्णालयात बेशिस्त, अस्वच्छता, कर्मचारी, डॉक्टरांची कमतरता आदी प्रश्न यावेळी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले. स्वच्छता कर्मचारी, कोरोना काळात सेवा देणारे कर्मचारी, चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांनीही सेवेत कायम ठेवण्याची मागणी केली.

मुश्रीफ म्हणाले, या रुग्णालयात सेवेमध्ये अनेक कमतरता आहेत. त्यांची पूर्तता करण्याची गरज आहे. रुग्णालयात मंजूर झालेले 500 खाटांचे रुग्णालय, निवासी डॉक्टरांसाठी तीनमजली इमारत आणि अद्ययावत शवागार यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीच्या अंदाजपत्रकात तरतूद करून निधी मंजूर केला जाईल. याशिवाय सिव्हिलच्या इमारतीला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तातडीने त्याचे फायर ऑडिट करण्यात येईल. येथील रिक्त पदे मंजूर केली जातील. वर्ग तीन आणि चारचे कर्मचारीही तातडीने भरण्यात येतील. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक रवींद्र वळवडे, अभिजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे, शिवसेनेचे नेते महेंद्र चंडाळे, आंबेडकरी चळवळीचे नेते सुरेश दुधगावकर, संतोष पाटील, आशिष कोरी यांनी सिव्हिलमधील विविध समस्या मांडल्या.

सांगलीचे हॉस्पिटल सक्षम करा : आ. गाडगीळ

कोणतीही यंत्रणा अथवा रुग्णालय मंजूर झाले, तर ते मिरजेला स्थलांतरीत करण्यात येते. सांगलीवर कायम अन्याय केला जातो, अशी खंत आ. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली. सांगलीचे हॉस्पिटल सक्षम करावे, आवश्यक त्या यंत्रणा, मशिनरी येेथे उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.

अधिष्ठाता रोज तीन तास सांगलीत थांबणार

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर हे सांगली रुग्णालयात कधी येत नाहीत, अशा तक्रारी काहीजणांनी मांडल्या. यानंतर तुम्ही सकाळी मिरजेत आणि दुपारी सांगलीत असलेच पाहिजे, अशा सूचना मुश्रीफ यांनी त्यांना दिल्या. डॉक्टरांचे वेळापत्रकही जाहीर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी उद्यापासून अधिष्ठाता तीन तास सांगलीच्या रुग्णालयात थांबतील, असे सांगितले.

मंत्र्यांसमोर मांडलेल्या तक्रारी…

* सिव्हिलमधून ठराविक लॅबमध्येच चाचणी करण्यास सांगण्यात येते
* सर्रास सर्वांना बाहेरील औषधांची चिठ्ठी लिहून दिली जाते
* रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची, जेवण करण्याची व झोपण्याची कोठेच सोय नाही
* नियमित स्वच्छता केली जात नाही
* पुरेसा डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग नाही
* अधिष्ठाता सांगलीकडे फिरकत नाहीत

Back to top button